अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ जवळ कुंभार यांच्या शेताजवळील वळणावर कार व दुचाकीच्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी ८ वाजता घडली. सिद्धाराम भिमाशंकर कोळी (वय – २८ रा. सदलापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत सिद्धाराम भिमाशंकर कोळी हा सकाळी ११ वाजता त्याच्या मुलीचे जावळ काढण्यासाठी राजकुमार विश्वनाथ भोसगी व गजानन रामलिंग मुलगे दोघे राहणार सदलापूर या दोन्ही मित्रासोबत एकाच दुचाकीवरून वागदरी (ता. अक्कलकोट ) येथे गेले होते. जावळचा कार्यक्रम उरकून गावाकडे परतत असताना कुंभार यांच्या शेताजवळील वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव चारचाकी महिंद्रा कारने (क्र एम एच ०५ इ ए ५०५८) समोरून दुचाकीस्वाराना जोरात धक्का दिली.
या धडकेत दुचाकीवरील तिघे तरुण गंभीर जखमी झाले. त्यापैकी मयत सिद्धाराम भिमाशंकर कोळी (वय २८) यास डोक्यास गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाला तर सोबत असलेले राजकुमार विश्वनाथ भोसगी याच्या पायाला गंभीर दुखापत तर गजानन रामलिंग मुलगे याच्या हाताला गंभीर मार लागला असून दोघांना सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
या अपघातात दुचाकी व चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले असून कार मधील ४ जण जखमी झाले आहेत.कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याच रस्त्यावर दुपारी १ च्या सुमारास अपघातात ६ वर्षीय चिमुकलीने प्राण गमावले आहे. त्यानंतर सायंकाळी हा दुसरा अपघात झाला असून यामध्ये ही एक तरुणाने प्राण गमावले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची फिर्याद मोठा भाऊ मल्लिकार्जुन भिमाशंकर कोळी यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* क्रूझरच्या धडकेत ६ वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील श्रेया विठ्ठल चलगेरी (वय ६ वर्षे ) या चिमुरडीला भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी क्रूझर गाडीने पाठीमागून धडक दिल्याने जागीच ठार झाली. ही घटना वागदरी अक्कलकोट रोडवरील नागनाथ मंदिरासमोर सव्वा एकच्या सुमारास घडली.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, ५ नोव्हेंबर रोजी सव्वा एकच्या सुमारास धानलिंग मल्लिनाथ पोमाजी व श्रेया विठ्ठल चलगेरी हे मामा -भाची आपल्या शेतवस्तीवर रस्त्याच्या बाजूने पायी चालत जात असताना तेव्हा आळंदहुन अक्कलकोटकडे जाणाऱ्या चारचाकी क्रूझर (क्र के ए ०९ बी ०० २२) या वाहनाने पायी चालत जाणाऱ्या ६ वर्षीय श्रेयास पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत ती जमिनीवर कोसळली व गंभीर जखमी होऊन डोक्याला जबर मार लागला. गंभीर जखमी श्रेयास रुग्णवाहिकेतून अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तपासले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले.
वाहन चालक प्रवीण रेवणसिद्धप्पा डोले (रा. देगाव ता. आळंद ) यांच्या विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चालक व वाहन ताब्यात घेतले आहे. या घटनेची फिर्याद प्रकाश पोमाजी यांनी दिली असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भावीकट्टी हे करीत आहेत.