सांगली : सांगलीच्या आटपाडीतील साठे चौकात आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. या घटनेत पडळकर यांच्या गाडीसह त्यांच्या ताफ्यातील काही गाड्या फोडण्यात आल्या आहेत. गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस राजू जानकरांवर गाडी घालून जखमी केल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेत काही जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या नातेवाईकास राष्ट्रवादी गटात उमेदवारी मिळाल्याने पडळकर यांनी संतप्त होऊन हा प्रकार केल्याचा आरोपही जानकर यांनी केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सोसायटी गटातील उमेदवार पळवा- पळवीवरुन हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आले. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी अंगावर गाडी घातल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस जाळकर यांनी केला आहे.
साठे चौक या ठिकाणी घडलेल्या या राड्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस राजू जानकर यास गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीसह त्यांच्या ताफ्यातील तीन गाड्यांची तोडफोड केल्याचे वृत्त आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. उमदेवार पळवापळवीच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर तसेच शिवसेना – राष्ट्रवादी गट आमनेसामने आले आहेत. दोन्ही गटात चांगलाच वाद झाला आहे. पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलीय. काही कार्यकर्ते जखमीदेखील झाले आहेत.
सांगली येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका होत आहे. या निवडणुकांमुळे येथील वातावरण चांगलेच रंगले आहे. वाद विवादातून अशा मारामारीच्या घटनेत रुपांतर होत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष डावपेच आखताना दिसतोय. या घडामोडी घडत असताना आटपाडी येथे सोसायटी गटातील उमेदवार फोडाफोडीच्या मुद्द्यावरुन गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादी गट आमनेसामने आले. या दोन्ही गटात चांगलाच वाद झाला.
या वादामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आटपाडीमध्ये तणावाचे वातावरण असून वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी आपली कुमक वाढवली आहे. यापूर्वीदेखील गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 25 ऑक्टोबर रोजी पार पडली. तर 9 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 21 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबर केली जाईल. अर्ज मागे घेतल्यानंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सांगलीत तणावाचीच परिस्थिती राहणार आहे.