अक्कलकोट : अक्कलकोटहून सोलापूरला येणाऱ्या प्रवासी जीपचे टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार तर आठ जण जखमी झाले. हा अपघात आज मंगळवारी (ता. १६ ) सकाळी साडेदहाच्या सुमारास कुंभारीजवळील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर घडला. यातील मृत आणि जखमी सर्व अक्कलकोटचे आहेत. अक्कलकोटवर शोककळा पसरली आहे.
सकाळी अक्कलकोट वरून (एम एच १३ ए एक्स १२३७ ) या क्रमांकाची प्रवासी जीप सोलापूरकडे निघाली होती. ही जीप गंगाप्रसाद पेट्रोल पंपासमोर आली असता या जीपचे चालकाच्या बाजूचे पुढचे टायर फुटले. यामुळे दोन वेळा जीप पलटी झाली. त्यामध्ये प्रवासी रस्त्याच्या बाहेर फेकले गेले. पाच जण जागीच ठार झाले. तर एक जण उपचार सुरू असताना सायंकाळी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात मयत झाला. या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. साहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले व इतरांनी नागरिकांच्या मदतीने जखमीना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवले.
हा अपघात इतका भीषण होता की प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. काहीजण रस्त्याच्या खाली जाऊन पडले. प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मयतामध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. इतर जखमींवर सोलापुरातील सिव्हिल व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या अपघातात ठार झालेले सर्व सहा जण अक्कलकोट तालुक्यातील आहेत. त्यांची नावे व गावे पुढीलप्रमाणे- कटेव्वा यलप्पा बनसोडे ( वय-५५), त्यांचा मुलगा बसवराज यलप्पा बनसोडे ( वय- ४२), भावाचा मुलगा आनंद इरप्पा गायकवाड ( वय- २५ सर्वजण राहणार ब्यागेहळ्ळी ता. अक्कलकोट), तर लक्ष्मण मुरलीधर शिंदे ( वय- ४२ राहणार बणजगोळ, ता.अक्कलकोट ), आनंद युवराज लोणारी ( वय- २८ रा हसापूर रोड, अक्कलकोट ) व सुनीता सुनील महाडकर (वय ४० राहणार दोड्याळ ता. अक्कलकोट).
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जखमींची नावे अशी आहेत, अक्षय लक्ष्मण शिंदे (वय १९ रा. बणजगोळ ता.अक्कलकोट), समर्थ प्रशांत अनंत (वय २० रा. फत्तेसिंह चौक अक्कलकोट), विशाल दगडू गोरसे (वय २४ समता नगर अक्कलकोट), गुरुराज रविंद्र वांजरे (वय २८ रा बुधवार पेठ अक्कलकोट), सैपन इब्राहिम वाडीकर (वय ६० रा गौंडगाव ता. अक्कलकोट), रमाबाई यल्लप्पा बनसोडे (वय ५५ रा भिमनगर अक्कलकोट), विशाल यल्लप्पा बनसोडे (वय १८ रा भिमनगर अक्कलकोट), निजाम हनिफ मुल्ला (वय २८ रा. वागदरी ता . अक्कलकोट ) हे जखमी असून ते सध्या उपचार घेत आहे.
या घटनेबाबत यातील जखमी निसार अमशेद्दीन पिरजादे (राहणार ब-हाणपूर ता. अक्कलकोट) यांनी जीप चालकाविरुध्द फिर्याद दिली आहे. सदरचा अपघातग्रस्त महिंद्रा जीपचा चालक जलिल नझीर बागवान (रा.म्हेत्रे नगर अक्कलकोट) हा असून त्यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या बाबत वळसंग पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम.279,304 (अ),337,338,427 मो.वा.का.कलम.184/177, 34 (अ), (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले हे करीत आहेत.
* युवा शिक्षक ठार
आनंद युवराज लोणारी ( वय- २८ रा हसापूर रोड, अक्कलकोट ) हे अक्कलकोटमधील हन्नूर रोडच्या सौ. सुरेखा कल्याणशेट्टी ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक होते. तर ब्यागेहळ्ळी मधील आई व मुलाचा तसेच त्यांच्या नात्यातील एका तरुणाचा मृत्यू झाला. बणजगोळचे लक्ष्मण शिंदे यांचा मृत्यू झाला तर मुलगा अक्षय शिंदे जखमी झाला.
* आमदार कल्याणशेट्टींचा संताप
सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने एसटी बंद आहेत. त्यामुळे खासगी प्रवासी जीपमधून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होत आहे. प्रमाणाच्या बाहेर प्रवासी जीपमध्ये भरले जातात. यातूनच हा अपघात झाल्याचे नागरिकांनी सांगितले. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी या बद्दल आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. एसटीचा संप नसता तर आज अक्कलकोट तालुक्यातील सहा जणांचा जीव गेला नसता. महाराष्ट्र सरकारच्या आडमुठे धोरणामुळे एसटीचा संप सुरू आहे. प्रवाशांना जीव मुकावा लागतोय. ही बाब संतापजनक असल्याचे म्हटले.