नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना कृषी कायदे मागे घेण्याचे जाहीर केले. त्यानंतर आता काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. उद्या (20 नोव्हेंबर) देशभरात शेतकरी विजय दिवस साजरा करण्यात येणार आहे.
यामध्ये देशभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. विविध राज्यात किसान विजय रॅली आणि किसान विजय सभा आयोजित केल्या जाणार आहेत. देशभरातील काँग्रेसी कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
केंद्राने पारीत केलेले तीन शेतकरी कायदे रद्द झाल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेत्यांनी आज शेकऱ्यांच्या एकजूटीचा आणि संघर्षाचा विजय झाल्याची भावना व्यक्त केली. तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत केंद्राला शेतकऱ्यांसमोर झुकावं लागल्याची टीका केली. आता काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी देशभरातील काँग्रेसच्या सर्व ब्लॉक प्रमुखांना पत्रं लिहिलं आहेत. त्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण देशात विजय दिवस साजरा करा. रॅली काढा. तसेच देशाच्या विविध भागात संध्याकाळी कँडल मार्च काढून या संघर्षात बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करा, असं आवाहन काँग्रेसने केलं आहे.
शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात संघर्ष उभा केला. त्याला काँग्रेससह विरोधी पक्षानेही बळ दिलं. त्यामुळे सरकारला झुकावं लागलं, असा काँग्रेसने दावा केला आहे. पुढील वर्षी पंजाब, गोवा, उत्तर प्रदेशात निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर या वातावरणात जनमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेसने हालचाली चालु केल्या आहेत. त्याचाच एक भाग उद्याचा जल्लोषाचा असणार आहे.
* लखीमपूर खेरीत योग्य कार्यवाही व्हावी – प्रियंका गांधी
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शेतकरी शहीद झाले. त्यांच्या कुटुंबीयांना मी भेटले. त्यांचं दु:ख मी समजू शकते. सरकार गंभीर आहे तर त्यांनी लखीमपूर खेरीबाबत योग्य कार्यवाही करावी. केंद्रीय मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. या देशात शेतकऱ्यांसोबत सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या अनेक समस्या आहेत. ते कर्जात बुडाले आहेत. काही शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी ज्या गोष्टी आंदोलन करत आहेत. त्याची दखल घ्यावी. ते प्रश्न सोडावावेत, अशी मागणीही प्रियंका गांधी यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, गुंडे, देशद्रोही आणि दहशतवादी कोण म्हणालं होतं? तुमचेच नेते हे बोलत होते ना? त्यावेळी तुम्ही काय करत होता. तेव्हा मोदी गप्प का होते? मोदींनीच शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणून हिणवलं होतं, असंही प्रियंका गांधींनी आवर्जून निदर्शनास आणून दिलं.