अमरावती : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या मुस्लीम मोर्चातील हिंसाचाराने जखमी झालेल्यांची भेट घेतली. ते म्हणाले की, 12 तारखेच्या घटनेचे रिॲक्शन म्हणून 13 तारखेची घटना घडली. मात्र, ठाकरे सरकार 12 तारखेची घटना डिलीट करुन केवळ हिंदुंवर कारवाई करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस यांनी अमरावतीमध्ये केलाय.
देवेंद्र फडणवीस आज रविवारी अमरावती परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली.
12 तारखेच्या घटनेवर महाविकास आघाडीतील एकही जण बोलत नाही. केवळ हिंदुंवर कारवाई होत असेल तर भाजप जेलभरो आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
इतके मोठे मोर्चे राज्यातील वेगवेगळ्या शहरात एकाच दिवशी निघतात, अमरावतीमध्ये 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या मोर्चाला परवानगी होती का, किती लोकांना परवानगी देण्यात आली, कोणी परवानगी दिली? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
फेक न्युजच्या आधारे हे मोर्चे प्लॅन केले गेले. समाजाला भडकवण्यात आलं. दंगल भडकवण्यासाठी समाजकंटकांनी एका विशिष्ट समुदायाच्या आस्थापनांना, लोकांना टार्गेट करण्यात आलं. असे सांगत 12 तारखेची घटना घडली नसती तर 13 तारखेची घटना घडली नसती, असेही फडणवीसांनी म्हटले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कुठल्याच हिंसेंच समर्थन केल जाऊ शकत नाही. मात्र, पोलीस 13 तारखेला घडलेल्या घटनेवर कारवाई करत आहेत. परंतु, 12 तारखेच्या मोर्चाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, हे अत्यंत चुकीचे असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
यासोबत, भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी एकतर्फी कारवाई केली आहे. त्यांना मारहाणही करण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. एकतर्फी कारवाई करायची असेल, खोट्या गुन्ह्यात अडकावयाचे असेल तर आम्ही भाजप पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसह जेलभरो आंदोलन करू, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
दरम्यान, अमरावती इथलं वातावरण बिघडण्याचा भाजपाने प्रयत्न करू नये. अमरावतीची जनता अशा द्वेषाच्या राजकारणाला बळी पडणार नाही, 12 आणि 13 तारखेला अमरावतीत जे घडलं तो अमरावतीच्या इतिहासातील काळा अध्याय होता, आता याचं राजकारण करून कोणी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये, अशी प्रतिक्रीया अमरावतीच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. अमरावतीची जनता सूज्ञ आहे, ते दंगेखोरांच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास ॲड यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.