सोलापूर : गुंजेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथे राहणाऱ्या पूजा संदीप पाटील (वय ३०) या विवाहीतेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (ता.२४) सकाळच्या सुमारास घडली. तिला शंकर पवार (वडील) यांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पूजा हिचा पती संदीप पाटील यांनी दुसरे लग्न केले. हा प्रकार समजल्यानंतर त्याचे टेन्शन घेऊन तिने विषारी द्रव प्राशन केली, अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
* चारचाकी वाहनांच्या अपघातात दुचाकीवरील तिघे जखमी
तुळजापूर रोडवरील हिप्परगा परिसरातील पुलाजवळ चार चाकी वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील सौरभ बाळू गजाकोश (वय २५), अमोल इरेश शटगार (वय ३२ दोघे रा. मौलाली चौक) आणि राजू यल्लाप्पा बुगले (वय२४. रा.बापुजी नगर) असे तिघे जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडला. ते तिघेजण दुचाकीवरून तुळजापूर ते सोलापूरच्या दिशेने येत होते. या अपघाताची नोंद जोडभावीपेठ पोलिसात झाली आहे.
* आष्टे येथे आत्महत्येचा प्रयत्न
आष्टे (ता.मोहोळ) येथे राहणाऱ्या अर्चना दिलीप कापुरे (वय २३) या महिलेने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. तिच्यावर मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* हन्नुर येथे चंदन चोरांना अटक; २ लाख ३२ हजाराचा माल जप्त
अक्कलकोट तालुक्यातील हन्नुर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दुचाकीवरुन जाणाऱ्या चंदन चोरांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून २२ किलो चंदनाची लाकडे, दुचाकी आणि इतर साहित्य असा २ लाख ३२ हजाराचा माल जप्त केला. ही कारवाई रविवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली .
विजय शिवाजी फसके (वय ४०) गणेश शिवाजी घोडके (वय ३५ दोघे रा. मालेगाव ता.बार्शी) आणि नितीन राऊत (वय ३० रा. सर्जापूर ता. बार्शी )अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
हन्नुर ते इटकळ मार्गाकडे दुचाकीवरून चंदनचोर जाणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी रविवारी सायंकाळच्या सुमारास इटकळ मार्गावर सापळा रचला. तेव्हा दुचाकीवरुन फसके आणि घोडके असे इटकळच्या दिशेने निघाले होते.
पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता दोघेही पसार झाले. तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून २२ किलो चंदनाची लाकडे, दुचाकी आणि इतर साहित्य असा २ लाख ३२ हजाराचा माल जप्त केला. चोरीचे चंदन हे त्यांनी सर्जापूर येथील नितीन राऊत याला विकणार असल्याचे समजले. त्याप्रमाणे पोलिसांनी तिघांविरुद्ध चोरी आणि भारतीय वन अधिनियमाप्रमाणे अक्कलकोट उत्तर पोलिसात गुन्हा दाखल केला.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार खेडकर, सहाय्यक फौजदार खाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले आणि समीर शेख यांनी केली पुढील तपास फौजदार खेडकर हे करीत आहेत.