नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा प्रकार आढळला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. आफ्रिका आणि इतर देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर ठेवावी, विमानतळांवर अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, आंतरराष्ट्रीय विमानसेवेवरील निर्बंध हटवण्यासंबंधीच्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा, राज्यांनी सतर्क राहावे, असे निर्देश मोदींनी दिले आहेत.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र यांच्याकडे विनंती केली आहे. मोदींना ‘कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे प्रभावित झालेल्या देशांतील उड्डाणे थांबवावीत’, अशी विनंती केली आहे. तसेच आता कुठे देश कोरोनापासून सावरला आहे. हा नवीन प्रकार भारतात येण्यापासून रोखण्यासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत, असं ते म्हणाले. दरम्यान, मोदींनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय होऊ शकतो.
ट्विटमध्ये मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की त्यांनी त्या देशांची उड्डाणे थांबवावीत. जिथे कोविड-19 चा नवीन व्हेरियंट मिळाला आहे. मोठ्या कष्टाने आपला देश करोनापासून सावरला आहे. हा नवीन व्हेरियंट भारतात येण्यापासून रोखण्यासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत.’ असे ट्विट आज मुख्यमंत्री केजरीवाल यांंनी केले आहे.
नवीन कोविड व्हेरियंटमुळे आफ्रिकन देशांना येणारा धोका लक्षात घेता, केजरीवाल यांनी काल तज्ञांना आवश्यक सूचनांसह दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) कडे सादरीकरण करण्याची विनंती केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आल्याने चिंता आणखी वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा बी 1.1529 हा नवा विषाणुचा प्रकार आढळला आहे.
जगभरात डेल्टा विषाणुने थैमान घातल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यातच आता हा नवा विषाणु डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक आणि वेगाने पसरत जाणारा असल्याचं बोललं जात आहे. आतापर्यंत या नव्या विषाणुचे 77 रुग्ण आढळून आले आहेत. ज्यापैकी बहूतांश रूग्ण दक्षिण आफ्रिकेतील असून काही हाॅंगकाँगमधील असल्याची माहिती समोर आली आहे.
भारतात आता नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. तसेच त्यांची तपासणीही करण्यात येणार आहे. फेब्रूवारी किंवा मार्च महिन्यात भारतात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, आता कोरोनाचा धोका वाढू नये आणि कोरोना महामारीचा फैलाव आणखी होऊ नये, यासाठी काळजी घेण्याचं काम सरकारतर्फे करण्यात येत आहे. तसेच नव्या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन देशातील सर्वच राज्यांना पत्र लिहून केंद्र सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच परदेशी पर्यटक आणि प्रवाशांवर लक्ष ठेवण्याच्या सुचनाही दिल्या आहेत.