मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्या, निसर्गाचं असंतुलन व सरकारी धोरण यांचा शेतकरी व त्यांच्या कुटुंबांवर होणारा परिणाम दर्शवणारा फास चित्रपट 4 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. फ्रान्समध्ये झालेल्या कान चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाचं स्क्रिनिंग करण्यात आलं आहे. तसेच देश आणि विदेशातील 130 पेक्षा जास्त पुरस्कार या चित्रपटाने जिंकले आहेत. या चित्रपटात उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे हे प्रमुख भूमिकेत आहेत.
समाजाभिमुख कथानक आणि मातब्बर कलाकारांच्या अभिनयाचं नैसर्गिक सादरीकरण या ‘फास’ चित्रपटाची मुख्य जमेच्या बाजू आहेत. याला प्रसंगानुरूप गीत-संगीताची जोड देत चित्रपटाच्या कथेत मांडण्यात आलेला विषय प्रेक्षकांच्या मनापर्यंत अचूकपणे पोहोचवण्याचं काम केलं आहे. रिअल लोकेशन्सवरील चित्रीकरण प्रेक्षकांना रोमांचक अनुभव देणारं ठरणार आहे.
‘फास’ हा चित्रपट 4 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर या चित्रपटाने देश-विदेशातील विविध नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये 130 पेक्षा अधिक पुरस्कारांवर आपलं नाव कोरले आहे. यामुळे मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘माँ एंटरटेनमेंट” प्रस्तुत माहेश्वरी पाटील चाकूरकर निर्मित ‘फास’ हा चित्रपट समाजातील सद्यस्थितीवर भाष्य करणारा आहे. नरेश पाटील, पल्लवी पालकर, दयानंद अवरादे, बसवराज पाटील, अनिल पाटील, वैशाली पद्देवाड हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. हा चित्रपट अविनाश कोलते यांच्या दिग्दर्शनाखाली बनला आहे. याद्वारे महत्त्वाच्या मुद्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सातत्याने वाढत असलेल्या शेतक-यांच्या आत्महत्या, निसर्गाचं असंतुलन व सरकारी धोरण यांचा शेतकरी व त्यांच्या कुटुंबांवर होणारा परिणाम या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, कमलेश सावंत, पल्लवी पालकर, गणेश चंदनशिवे, नामदेव पाटील, निलेश बडे, ज्ञानेश उंडगवकर, उमेश राजहंस, शरद काकडे, ईश्वर मोरे, पवन वैद्य, विनय जोशी, देवा पांडे, पूजा तायडे, तेजस्विनी, माधुरी भारती आणि श्रृतिका लोंढे या कलाकारांनी यात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
‘फास’ची कथा व संवादलेखन माहेश्वरी पाटील चाकूरकर यांचे असून पटकथा अविनाश कोलते यांनी लिहिली आहे. कॅमेरामन रमणी रंजन दास यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली असून अपूर्वा मोतीवाले व आशिष म्हात्रे यांनी संकलन केलं आहे. गीतकार अमोल देशमुख यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार ऍलन के. पी. यांनी संगीत दिलं आहे. कला दिग्दर्शन संतोष समुद्रे यांनी केलं आहे.
” या चित्रपटाची कथा-पटकथा लिहिताना विशेषतः शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या बारीक-सारीक मुद्दयांचा अत्यंत बारकाईनं आणि चिकित्सक बुद्धीनं अभ्यास केला आहे. मनोरंजनाचं माध्यम हे समाजातील वास्तव दाखवण्याचं काम केलंय”
अविनाश कोलते – दिग्दर्शक