अहमदनगर : जिल्ह्यातील शेवगावमध्ये अज्ञातांनी एसटी बसवर दगडफेक केली आहे. ही बस अहमदनगर वरून श्रीरामपूरकडे चालली होती. एसटी सोबत पोलीस बंदोबस्त असेल सांगण्यात आले होते. मात्र आज कोणतेही संरक्षण नव्हते. एसटी तालुक्यातील अमरापूर येथे पोहोचल्यानंतर अज्ञात इसमाने एसटीच्या मागील बाजूस दगड मारल्याने काच फुटली आहे.
महामंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील काही आगारांमधील एसटी वाहतूक सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे संपकऱ्या कर्मचाऱ्यांचा विरोध कायम आहे. अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव आगाराच्या तीन एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एसटी बस चालक जखमी झाला आहे. या दगडफेकीच्या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील फक्त एकाच आगारातील संप मागे घेण्यात आला आहे. आज सकाळपासून शेवगाव आगारातील वाहतूक सुरू झाली. शेवगाव आगारातून पैठण, नगर शहर, श्रीरामपूरकडे जाणाऱ्या तीन एसटी बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. शेवगाव-नगर बसवर अमरापूरजवळ बसच्या मागील बाजूस दगडफेक केली. यामध्ये बसची काच फुटली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शेवगाव-श्रीरामपूर बसवर सौंदळा येथे दगडफेक झाली. शेवगाव-पैठण बसवर दहिफळ फाटा येथे दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एसटी चालक नामदेख खंडागळे जखमी झाले आहेत. या दगडफेकीची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी एकमताने संप मागे घेतला असल्याचे म्हटले जाते. त्यानंतरही एसटीवर दगडफेक अज्ञात कोण याबाबत चर्चा होत आहेत. एसटी बस पुन्हा सुरू झाल्याने खासगी वाहतूकदारांना याचा फटका बसणार होता. त्यामुळे त्यांच्याकडून हे कृत्य झाले असल्याची चर्चा आहे.
शेवगावकडून अहमदनगरकडे जाणारी बस क्रमांक एमएच ४० वाय ५४२८ या गाडीवर अज्ञात इसमाने तालुक्यातील अमरापूर येथे मागील बाजूस दगड मारल्याने काच फुटली आहे. श्रीरामपुरकडे जाणारी बस क्रमांक एमएच ४० एन ८८९५ वर सौंदळा ( भेंडा नेवासा), तसेच शुक्रवारी सायंकाळी पैठणकडे जाणाऱ्या एमएम ४० एम ८७५२ या बसवर दहिफळ फाटा येथे दगडफेक करण्यात आली आहे.
एसटी सुरु झाल्याने प्रवाशी व विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण दिसत असून संप मागे घेत एसटी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत मात्र विविध ठिकाणी दगडफेक सारखे प्रकार घडत असल्याने कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. काही आंदोलनकर्ते मात्र विलिनीकरणाच्या मुद्द्यावर अडून बसल्याने राज्यातील बहुतेक ठिकाणी संप अजून चालू आहे. तर काही ठिकाणी बस धावू लागल्या आहेत. परंतु काही ठिकाणी बसेसवर दगडफेक केली जात आहे.