नंदूरबार : भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राज्यातील सत्ता बदलाविषयी भाष्य केले आहे. ते म्हणाले, राज्यात भाजपचे सरकार येणारच. तो दिवस लांब नाही. फक्त ते आज येईल की उद्या याबाबत आम्ही भविष्यवाणी करणार नाही, असं दरेकर यांनी म्हटलं. नारायण राणे, रामदास आठवले यांच्यानंतर प्रविण दरेकर यांनी हे वक्तव्य केले आहे. यावरुन सरकार कोसळण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर आला असल्याचे वाटत आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही राज्यात लवकरचं भाजपची सत्ता येणार असल्याचं म्हटलं आहे. राज्यात महायुती तुटून महाविकास आघाडी सरकार आलं. हे सरकार आल्यापासून विरोधी पक्ष भाजपकडून वारंवार सरकार पडण्याची वक्तव्ये केली गेली. राज्यातील आघाडी सरकार कोसळण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. दरेकर आज नंदुरबार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
प्रवीण दरेकरांच्या हस्ते शहादा येथील सातपुडा तापी परिसर सहकारी कारखान्याच्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतर त्यांनी नंदुरबार बस स्थानकाच्या बाहेर ठाण मांडून बसलेल्या संपकरी एसटी कामगारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजपचा कर्मचारी आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा असल्याचं सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 100 कोटी वसूली प्रकरणी ईडीने अटक केली आहे. या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याकडून भाजपवर सडकून टीका केली जात आहे. भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप मलिकांनी अनेकवेळा केला आहे. त्यांच्या या आरोपांना प्रवीण दरेकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आपला अनिल देशमुख होईल, अशी नबाव मलिकांना भीती वाटत आहे. याच भीतीतून ते केंद्रीय तपास यंत्रणेवर आरोप-प्रत्योराप करुन ग्राऊंड तयार करत आहेत. ईडीच्या कारवाया या आमच्या सांगण्यावरुन होत नाहीत. यंत्रणा आपल्या चौकटीत राहून काम करत आहेत. जर केंद्रीय तपास यंत्रणांनी चुकीचे काम केले तर न्याय व्यवस्था आहेच. राज्य सरकावर कुठलीही टीका केली तर ते लगेच केंद्राकडे बोट दाखवून आपलं अपयश लपवत असल्याचा आरोप दरेकरांनी केला.
दरम्यान, ठाकरे सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोन वर्षातील ठाकरे सरकारच्या कामगिरीबाबत अनेकजण मत व्यक्त करत आहेत. महाविकास आघाडी नेत्याकडून सरकार पाचवर्षाचा काळ पूर्ण करुन पुढील निवडणूकही एकत्रित लढणार अस सांगितले जात आहे. तर भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकार पडणार असल्याचे सांगितले जात आहे.