सोलापूर : क्रिकेट खेळताना नो बॉल दिला म्हणून अंपायरचे डोके फोडल्याची घटना घडली. याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
क्रिकेट खेळताना नो- बॉल दिला म्हणून अंपायर म्हणून खेळणा-या रविंद्र खंडेपल्ली (वय २३ रा. गांधीनगर,लष्कर) याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून भिंतीवर डोके आपटल्याने तो जखमी झाला. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
काल सायंकाळच्या सुमारास दत्तनगर येथील संगा पान दुकानाजवळ काही मुले क्रिकेट खेळत होती. त्यावेळी सुमित खंडे पल्ली याने नोबॉल डिक्लेअर केला. तेव्हा सुरेश कुकुल या खेळाडूने त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याचे डोके भिंतीवर आदळले. त्यामुळे डोक्यास मार लागून तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे .
* एसटीवर दगडफेक; ड्रायव्हर जखमी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील निम्बर्गी कॅनॉल पाटीजवळ अनोळखी इसमाने बसवर दगडफेक केल्याने सिद्धाराम द-याप्पा गुरव (वय ४९ रा. बाळे ता.उत्तर सोलापूर) हे बस चालक जखमी झाले. ही घटना काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
सिद्धाराम हे भंडारकवठे येथून सोलापूरकडे एसटी घेऊन निघाले होते. निम्बर्गी पाटीजवळ अनोळखी इसमाने दगडफेक केल्याने समोरची काच फुटली. आणि छातीवर दगड लागल्याने ते जखमी झाले. त्यांना मंद्रूप येथे प्राथमिक उपचार करुन शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तालुका पोलिसात याची नोंद झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* शॉक बसून मुलगा जखमी
डिग्गेवाडी (ता.अक्कलकोट) येथे घराशेजारच्या धाब्यावर खेळत असताना विद्युत वहिनीच्या शॉक बसल्याने संतोष सचिन जाधव (वय १४) या मुलाच्या हाताला शॉक बसून तो किरकोळ जखमी झाला. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. त्याला अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
* नशेत आत्महत्येचा प्रयत्न
शंकरगाव (ता.पंढरपूर )येथे राहणाऱ्या लिंगादेव मारुती पांढरे (वय २८) याने दारुच्या नशेत विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आज रविवारी सकाळी घडली. त्याला पंढरपूर येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात रामदास होनमाने (मित्र) यांनी दाखल केले.
* वडवळ येथे आत्महत्येचा प्रयत्न
वडवळ (ता.मोहोळ) येथे राहणाऱ्या सूर्यभान यशवंत जगताप (वय ८०) या वृद्धांनी रागाच्याभरात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी बेशुद्धावस्थेत सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तालुका पोलिसात याची नोंद झाली आहे .