सोलापूर : येथील भैया चौकातील बसथांब्याजवळ वाहतूक शाखेच्या पोलिसाला फरफटत नेऊन त्याचा हात फ्रॅक्चर करण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस शिपाई अमोल सुरेश बेगमपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागनाथ बाळू कोकरे (वय २७, रा. साठे पाटील वस्ती, दमाणीनगर) याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे भैया चौकात वाहतूक नियमनाचे काम करीत होते. त्यावेळी आरोपी हा विनानंबरप्लेटच्या मोटरसायकलवरून मरीआई चौकातून भैया चौकाकडे जात होता. फिर्यादीने त्यास थांबण्याचा इशारा केला असता, त्याने मोटारसायकल थांबवली नाही.
पोलिसाने मोटारसायकलच्या पाठीमागील बाजूस बारला धरले असता दुचाकी न थांबवता त्यांना तसेच फरफटत नेले. त्यामुळे पोलिसाच्या उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. फिर्यादीस जखमी करून शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल कोकरेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.
* तिर्हे येथे अपघातात दुचाकीवरील मजूर ठार
सोलापूर – तिर्हे येथील सिद्धनाथ साखर कारखान्याजवळ अनोळखी वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील सुनील सिद्राम माळी ( वय ३२ रा. हिरज ता. उत्तर सोलापूर) हा मजूर गंभीर जखमी होऊन मरण पावला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हा अपघात शनिवारी (ता. २७) रात्रीच्या सुमारास घडला. सुनील माळी हा कारखान्यात मजुरी करीत होता. काल रात्री तो दुचाकीवरून कारखान्याकडे निघाला होता. तिर्हे ते सोलापूर रोड वरील अनोळखी वाहनाच्या धडकेने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तालुक्याच्या पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला.
या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली. ट्रॅक्टरच्या धडकेने अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. हवालदार सय्यद पुढील तपास करीत आहेत .
* रेल्वेखाली सापडून तरुण ठार
सोलापूर – विजापूर रोडवरील संभाजी तलावाजवळ धावत्या रेल्वे खाली सापडल्याने शंकर सिद्धाराम आळगुंडगी (वय ३२ रा.किसाननगर, देवी मंदिराजवळ अक्कलकोट रोड) हा तरुण मयत झाला. ही घटना शनिवारी (ता. २७) रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.
शंकर आळगुंडगी हा अविवाहित असून तो टॉवेल कारखान्यात कारखान्यात मजुरी करीत होता. बऱ्याच दिवसापासून त्याला काम नसल्याने तो निराश होता. घटनेच्या एक दिवसापूर्वी तो कामाला जातो म्हणून घरारन गेला होता. काल त्याचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळला. खिशातील आधार कार्ड वरून त्याची ओळख पटली.
या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली. असून हवालदार हार पुढील तपास करीत आहेत.