सोलापूर : एसटी आणि फॉर्च्युनर गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी गावचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे यांच्यासह त्यांचे तीन सोबती जागीच ठार झाले ही घटना कर्नाटक राज्यात घडली. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
कर्नाटकातील विजयपूर हुबळी महामार्गावरील जुमनाळ येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी गावचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे यांच्यासह चार जण जागीच ठार झाले आहेत. चिदानंद नागेश सुरवसे (वय 47, रा. नांदणी), चालक सोमनिंग गडेप्पा काळे (वय 42, रा. राजूर), संदीप विठ्ठल पवार (वय 40, रा.बसवनगर, ता. दक्षिण सोलापूर) व नागठाणचे आमदार देवानंद चव्हाण यांचे भाचा विजय दोडमनी या अपघातात मृत्युमुखी पडले. गाडीचा चालक सोमनिंग काळे अत्यंत गरीब कुटुंबातील होता. दिवंगत माजी मंत्री आनंदराव देवकते यांच्या कुटुंबात त्याने अनेक वर्षे चालक म्हणून काम केले होते. शांत व मितभाषी होते.
अपघातग्रस्त फॉर्च्युनर कारमध्ये सुरक्षेसाठी सहा एअरबॅग देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष अपघात झाल्यानंतर या एअरबॅगचा काहीच उपयोग झाला नाही. अन्यथा कारमधील सगळ्यांचा मृत्यू झाला नसता. सीटबेल्ट लावलेला नसला तरी चालकाकडील एअरबॅग आपोआप उघडते. मात्र इथे त्याही एअरबॅगने धोका दिला.
अपघात इतका भयंकर घडला आहे की टॉपमॉडल फॉर्च्युनर कार अक्षरश: पलटी होऊन फुटली आहे. कारचे इंजिन तुटून पडले आहे. कारमधील चौघेही कारमधून रस्त्याच्या बाजूला फेकले गेले आहेत. त्याचवेळी एसटी बसचे मात्र किरकोळ नुकसान झाले आहे.
फॉर्म्युनर गाडीतून माजी सरपंच चिदानंद सुरवसे, संदीप विठ्ठल पवार, चालक सोमनाथ काळे आणि विजय हे चौघे सोलापूरकडे निघाले होते. मृत चिदानंद सुरवसे (वय 47) यांची फॉर्च्युनर गाडी एम एच 13 सी एस 3330 ही कर्नाटक राज्यातील एसटी क्रमांक के ए 22 एफ 2198 ला धडक झाल्यानंतर पलटी होऊन चक्काचूर झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या अपघातानंतर चौघेही जागीच ठार झाले आहेत. एसटी बस आणि फॉर्म्युनर गाडीची समोरासमोर धडक बसल्यानंतर फॉर्म्युनर गाडी पलटी झाली. यामुळे चौघेही गाडीखाली अडकले. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागल्याची माहिती आहे.
चिदानंद सुरवसे यांचे व्यावसायिक कामानिमित्त नेहमीच कर्नाटकात जाणे-येणे होते. नांदणी येथील चेकपोस्टचा त्यांच्याकडे ठेका असल्याने कर्नाटक महाराष्ट्रातील वाहतूक व्यवसायाशी त्यांचा सातत्याने संपर्क असायचा. याच निमित्ताने ते कर्नाटकात गेले असता काळाने त्यांच्यावर घाला घातला.
दरम्यान या चारी मृतदेहांना विजयपूर मधील सिविल हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आले आहे. चिदानंद सुरवसे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक होते. नांदणीचे ते अनेक वर्षे सरपंच राहिले आहेत. या अपघातानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर कारमधील चौघेही कारमधून बाहेर फेकले गेले. चौघांचाही जागेवरच मृत्यू झाला. मात्र चौघेसुध्दा भयंकर रक्तबंबाळ झालेले नव्हते किंवा त्यांच्या शरीरातील अवयवांचीही मोठ्या प्रमाणावर तुटफूट झालेली दिसून आली नाही. किरकोळ रक्तसाव वगळता फारमोठ्या जखमाही छायाचित्रात दिसत नाहीत.
मृत चिदानंद सुरवसे हे दक्षिण सोलापूर तालुक्यात धनगर समाजाचे नेतृत्व पुढे आले होते. संघटन निर्माण करताना आणि उद्योग व्यवसाय उभारताना त्यांनी अनेकांची दुश्मनीही पत्करली होती. त्यामुळे घटनास्थळाचे दृश्य पाहता हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय अनेक नांदणीकरांनी बोलून दाखवला आहे.