मोहोळ : भिमानगर येथील अपघातात मोहोळ येथील सोमनाथ लक्ष्मण माळी या तरुणाचा समावेश असून तो पुणे येथे एअर फोर्स चा लेखी परीक्षेसाठी निघाला होता, मात्र काळाने त्याच्यावर झडप घातली. त्याचा दुर्देवी मृत्यू झाला त्याच्यावर मोहोळ येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या उजनी धरणासमोर भीषण अपघातात ट्रक, टँकरची समोरासमोर धडक होऊन ५ जण ठार आणि ६ जण जखमी झाले. ट्रकचालक शिवाजी नामदेव पवार व टँकरचालक संजय शंकर कवडे (रा. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्यासह मालमोटारीतून प्रवास करणाऱ्या व्यंकट दंडघुले (रा. सालेगाव, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) आणि अन्य दोघे अनोळखी प्रवासी यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर दत्ता अशोक घंटे (वय २४, रा. सालेगाव, ता. लोहारा), व्यकूसिंह रतनसिंह राजपूत (वय ६६, रा. केसरजवळगा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद), गौरी दत्ता राजपूत (वय ३३, रा. पुणे), तिची मुले धीरज (वय १२) व मीनल (वय ४) आणि सुलोचना गोटूसिंह राजपूत (रा. पुणे) हे सहाजण जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ येथील माळी गल्लीत राहणाऱ्या सोमनाथ लक्ष्मण माळी हा २५ वर्षीय युवक गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस भरती तसेच एअर फोर्स भरतीसाठी सातत्याने प्रयत्न करत होता. आईचे सात वर्षांपूर्वी छत्र हरपले तरीही वडिलांनी हमाली करत त्याला प्रोत्साहन दिले. त्यानेही जिद्दीने पोलीस भरती च्या परीक्षेची तयारी केली होती.
गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या कालावधीमध्ये परीक्षा झाल्या नाहीत, मात्र त्याने खचून न जाता दुकानामध्ये काम करत स्वतः पैसे जमवले. व त्यातूनच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश घेतला. त्यामाध्यमातून तो तयारी करत होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान दि. २८ नोव्हेंबर रोजी पुणे येथे एअरफोर्सचा लेखी परीक्षेचा पेपर सकाळी आठ वाजता असल्यामुळे त्याने दि.२७ रोजी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान मोहोळ शहरातून पुण्याकडे निघाला होता. मात्र एसटीचा संप असल्याने त्याने मोहोळकडून पुण्याकडे निघालेल्या ट्रक क्रमांक एम एच २५ यु ४०४५ या तांदूळ वाहतूक करणाऱ्या ट्रक मधून पुण्याकडे जाण्याऱ्या ट्रकमधून पुण्याकडे निघाला होता.
त्यांच्यासोबत इतर आठ ते दहा प्रवासी होते. दरम्यान साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सदरचा ट्रक हा सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील भिमानगर (ता. माढा) गावच्या हद्दीतील एका ढाब्यासमोर आला असता पुण्याकडून सोलापूरकडे निघालेल्या मळी वाहतुकीच्या टँकर क्रमांक एम एच २५ सी.पी. ४०२० ची समोरासमोर जोराची धडक झाली.
हा अपघात एवढा भयानक होता की, या अपघातात पाच मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाले. या मृतांमध्ये मोहोळ येथील सोमनाथ माळी याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. तर शरीरापासून मुंडके वेगळे झाल्यामुळे पहाटेपर्यंत पोलीस व सामाजिक कार्यकर्ते त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते.
अखेर त्याच्या खिशातील मोबाईल च्या अखेरच्या कॉल वरून त्याच्या मोहोळ येथील मित्राला संपर्क करून ओळख पटवून नातेवाईकांना संपर्क करण्यात आला. त्यानंतर त्याचे नातेवाईक टेंभुर्णी येथे गेले व प्रेत ताब्यात घेऊन दि. २८ रोजी दुपारी मोहोळ येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत सोमनाथ त्याच्या पश्चात वडील, एक भाऊ व एक विवाहित बहीण असा परिवार आहे.