बार्शी : वैराग नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढविण्याचा निर्णय भूमकर गटाच्या बैठकीत घेण्यात आला.
नगरपंचायत निवडणुकीबाबत विचारविनिमय करण्यासाठी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, माजी पंचायत समिती सदस्य निरंजन भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत भूषण भूमकर, राजेंद्र खेंदाड, कुमार पौळ, बाळासाहेब भूमकर, हनुमंत पांढरमिसे, सादिक शेख, गालिब शेख, नागनाथ पोळ, अब्बास कादरी, किशोर इंगळे, दादा मोहिते आदी उपस्थित होते.
विधानसभेची मागील निवडणूक निरंजन भूमकर यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून लढविली होती. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादीच्या सहभागाने महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर भूमकर यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून तालुक्यात विकासकामे आणण्याचा प्रयत्न केला आहे.
वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याबाबतही त्यांनी आग्रहाने पाठपुरावा केला होता. राष्ट्रवादीच्या शिर्षस्थ नेतृत्वाशी त्यांनी कटाक्षाने थेट संपर्क ठेवला आहे. गेली दोन वर्षे ते पक्षीय पातळीवर सक्रिय आहेत. नुकतेच त्यांना जिल्हा नियोजन समितीवर नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच आगामी राजकारण करण्याबाबत ते आग्रही आहेत. कार्यकर्त्यांनाही त्यांनी याबाबतीत पटवून दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* वैरागमध्ये राऊत गट भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणार
बार्शी : वैराग नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढविण्याचा निर्णय आमदार राऊत गटाने घेतला आहे. वैराग येथे आ. राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीसंदर्भात विचारविनियम करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी माजी जि.प. सदस्य संतोष निंबाळकर, मकरंद निंबाळकर, वैजीनाथ आदमाने, ईस्माईल पटेल, राजाभाऊ निंबाळकर, नागेश खेंदाड, भरतेश गांधी, डॉ. भारत पंके, प्रणित गांधी आदी उपस्थित होते.
स्थानिक परिस्थितीमुळे एकत्र आलेल्या संतोष व मकरंद या निंबाळकर बंधूंनी नगरपंचायतची निवडणूक स्थानिक आघाडीच्या माध्यमातून लढविण्यासाठी चाचपणी सुरु केली होती. त्यानुसार मोर्चेबांधणी होत होती. मात्र ही निवडणूक भाजपच्या चिन्हावरच लढविण्यात येईल, असा निर्णय आ. राऊत यांनी घेतला आणि त्यादृष्टीने कामाला लागण्याच्या सूचना स्थानिक कार्यकर्त्यांना दिल्या.
यावेळी संतोष निंबाळकर यांनीही भाजपकडून निवडणूक लढविण्यास दुजोरा दिला. नगरपंचायत झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यास वैरागचा विकास करणे सोपे जाईल, निधी मिळविण्यात अडचण येणार नाही. असा सूर व्यक्त झाला.