सोलापूर : कार, रिक्षा व दुचाकीच्या झालेल्या तिहेरी अपघातात गंभीर जखमी झालेल्या एकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या पत्नीचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. हा अपघात दुपारी ४ च्या सुमारास सांगोला – पंढरपूर रोडवर घडला.
या अपघातानंतर रिक्षा चालक रिक्षा घेऊन पळून जाताना ग्रामस्थांनी बामणी (ता. सांगोला) गावात पकडले. ज्ञानदेव नामदेव भिसे (वय -४५) व बबिता ज्ञानदेव भिसे – (वय -४० दोघेही रा. फणेपुर ता. लोहारा जि. उस्मानाबाद) असे मृत पती-पत्नीची नावे आहेत. या अपघातात कार चालक जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस नाईक राहुल देवकते घटनास्थळी धाव घेऊन मृत व जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून सांगोला रुग्णालयात हलवले. मृतांचे नातेवाईक (मूळ फणेपूर ता.लोहारा जि. उस्मानाबाद) येथून आले. रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंदही झाली नाही.
* काळेगावमध्ये इंधन वाहिनीच्या कामात अडथळा आणणार्यांविरोधात गुन्हा दाखल
बार्शी : इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या इंधन वाहिनीच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी तालुक्यातील काळेगाव येथील संदीप दत्तात्रय वाघमारे , दत्तात्रय भिमराव वाघमारे, संजय दादासाहेब वाघमारे यांच्याविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत कॉर्पोरेशनचे पाकणी डेपोचे सहाय्यक व्यवस्थापक कुलदीप काशीनाथ आडे यांनी फिर्याद दिली आहे. कार्पोरेशनच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथील बल्क डेपोतून गुजरातपर्यंत इंधन वाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. ही वाहिनी काळेगाव शिवारातून जात आहे. तेथील काही शेतकरी कामात अडथळा करीत असल्यामुळे पोलीस संरक्षणामध्ये वाहिनी अंथरण्याचे काम सुरु आहे.
दुपारी 1 च्या सुमारास संदीप वाघमारे व दत्तात्रय वाघमारे हे पिता-पुत्र तसेच संजय वाघमारे कामाच्या ठिकाणी आले. त्यांनी कामास हरकत करत तुम्ही या ठिकाणी काम करायचे नाही, असे म्हणून कामात अडथळा आणला. पिकाचा मोबदला तुम्ही तात्काळ द्या, अशी मागणी केली.
त्यामुळे फिर्यादीने त्यांना तत्काळ बाधीत शेतजमीनीतील आंबा फळपिकाच्या नुकसान भरपाईची रक्कम चेकद्वारे देवु केली. परंतू तुम्ही देत असलेली रक्कम मला मान्य नाही. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी पाईपलाईनचे काम करायचे नाही, असे म्हणून त्यांनी कामातील वाहने अडविली.
बंदोबस्तावरील पोलिसांना शिवीगाळ केली. त्यामुळे अधिक पोलिस कुमक मागविण्यात आली. तिघांना पोलिस ठाण्यात घेवून जात असताना संदीप वाघमारे याने पोलीसांना धक्का देवुन खाली पाडून जखमी केले. स्वत:चे डोके जमिनीवर आपटून इजा करुन घेतली. यावेळी झालेल्या झटापटीत सपोनि. महारुद्र परजने, पोलिस अंमलदार मुंढे, शिंदे हे जखमी झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* शेतातून एक लाखाचे जनावरे पळविले
यावली (ता. मोहोळ ) येथे राहणाऱ्या जालिंदर नागनाथ कारंडे (वय ८२) यांच्या शेतात बांधलेल्या दोन म्हशी आणि दोन गाई असे एकूण ४ जनावरे चोरट्याने पळविले. हा प्रकार रविवारी पहाटेच्या सुमारास घडला. चोरीस गेलेल्या जनावरांची किंमत ९५ हजार इतकी आहे. अशी फिर्याद कारंडे यांनी मोहोळ पोलिसात दाखल केली .
* माढ्यात सशस्त्र दरोडा
सोलापूर – किचनच्या दरवाजाचे कुलूप तोडून सशस्त्र दरोडेखोरांनी मारहाण करीत ८६ हजाराचे दागिने लुटून पोबारा केला. ही घटना माढा येथील चवरे प्लॉट येथे रविवारी ( ता. २८) पहाटेच्या सुमारास घडली.
माढा येथील चिंचोली रोडवर शहाजी शामराव पवार (वय ७०) हे राहण्यास आहेत. शनिवारी रात्री जेवणखाण करून ते झोपी गेले होते. रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास चौघा दरोडेखोरांनी किचनच्या ग्रीलचे कुलूप तोडले. त्यानंतर लाकडी दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. शहाजी पवार आणि त्यांच्या मुलांना लाकडू दंडुक्याने मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील दागिने आणि घड्याळ लुटून पोबारा केला.
या घटनेची फिर्याद शहाजी पवार यांनी माढा पोलिसात दाखल केली आहे .