उस्मानाबाद : तुळजापूर येथे रात्री उशिरापर्यंत नियम आणि निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या गजगा डान्सबारवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून २५ महिला व ६५ ग्राहकांसह, बारमालक, दोन व्यवस्थापकांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी ९२ जणांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
यात रोख रक्कम, मोटारसायकली, चारचाकी वाहने असा एकूण एक कोटी २१ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग रस्त्यावर हंगरगा शिवारात गजगा डान्सबार अवैधरीत्या सुरू होता. दररोज रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या बारमध्ये महिला नृत्यांगना या ग्राहकांसमवेत अश्लील नृत्य करीत असल्याच्या तक्रारी पोलीस अधीक्षक नीवा जैन यांना प्राप्त झाल्या होत्या. पोलीस अधीक्षक जैन व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी तक्रारींची दखल घेत कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी एम. रमेश, तुळजापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील व पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानुसार पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री एक वाजता गजगा बारवर छापा टाकला असता बारमध्ये एकूण २५ महिला नृत्यांगना व ६४ ग्राहक पुरुष मद्यधुंद होऊन नृत्य करताना निदर्शनास आले. पोलीस पथकाने त्यांच्याकडून एक लाख ३८ हजारांची रोकड, देशी दारू, बीअरचा तीन लाख २० हजारांचा साठा, १७ चारचाकी वाहने व पाच दुचाकी अशी एकूण एक कोटी १५ लाख ६५ हजारांची वाहने, बारमधील एक लाख ६० हजार रुपयांचे साऊंड सिस्टीम असा एकूण एक कोटी २१ लाख ८३ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलिसांनी डान्सबारवर केलेल्या कारवाईत बारमालक तानाजी लकडे, चालक सागर कदम, मद्यपुरवठादार चंद्रकांत क्षीरसागर यांच्यासह २५ महिला नृत्यांगना व ६४ ग्राहक अशा एकूण ९२ जणांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक चनशेट्टी हे करीत आहेत.