मुंबई : खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाआधीच्या संगीत कार्यक्रमात राऊत आणि सुप्रिया सुळेंनी डान्स केला. यावरुन काहींनी टीका देखील केली होती. या टीकेला सुप्रिया सुळे यांनी उत्तर देत म्हणाल्या, तो एक कौटुंबिक कार्यक्रम होता, बाहेरचं कुणीच नव्हतं. एखाद्या खासगी कार्यक्रमात आम्ही काय करतो त्यावर पण जर कुणाला टीका करायची असेल तर त्यावर काय बोलणार? ते आमच्या घरातल्या मुलीचं लग्न होतं.
विरोधी पक्षातील काही नेत्यांकडून सुळे आणि राऊत यांच्यावर या डान्सवरुन जोरदार टीकाही करण्यात येतेय. या टीकेला आता सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तो एक कौटुंबिक कार्यक्रम होता. बाहेरचं कुणीच नव्हतं. अगदी आम्ही 50 लोकही एकत्र नव्हतं. आमच्या घरातल्या मुलीचं लग्न होतं. आम्ही सदानंद, मिसेस राऊत, मुलं असे सगळे त्या कार्यक्रमात होतो. एखाद्या प्रायव्हेट फंक्शनमध्ये आम्ही काय करतो त्यावर पण जर कुणाला टीका करायची असेल तर त्यावर काय बोलणार? अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संजय राऊत यांची कन्या पूर्वशीचा विवाह सोहळा सोमवारी अत्यंत थाटात पार पडला. मुंबईत रेनन्सां हॉटेलात ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा विवाह पार पडला. विवाह सोहळ्याला स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते.
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. लग्नात तुम्ही नृत्य करता. एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावे अंधारात आहेत. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का? असा खोचक सवाल विखे-पाटील यांनी केला होता.