सोलापूर : विजापूर रोडवरील नागेश ऑर्केस्ट्रा बार छापा प्रकरणात निलंबित असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांचे निलंबन मागे घेण्यात आले असून तसा आदेश पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी दिला आहे.
निर्बंध असतानाही नागेश बार सुरू राहिला कसा आणि त्याची माहिती तुम्हाला का नव्हती, असा ठपका ठेवत पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यावर ठोस कारवाई करत त्यांना थेट निलंबितच केले होते. त्यानंतर काही दिवसात दिवसातच डीबी पथक प्रमुख शीतलकुमार कोल्हाळ यांनाही निलंबित केले होते.
बुधवारी सायंकाळी आयुक्त यांनी पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांचे निलंबन मागे घेतले, याबाबत या बातमीला पाटील यांनी दुजोरा दिला आहे. मात्र अद्याप आपल्याला आदेश आला नसल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणात आपल्याला निलंबित करण्याची गरजही नव्हती. निलंबन रद्द होणार होतेच. आता त्याची मला माहिती मिळाली आहे. मात्र आदेश अजून मिळाला नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* मुळेगाव तांडा येथील जुगार अड्ड्यावर धाड; २२ जणांवर गुन्हा १२ जणांना अटक
सालापूर – मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर) येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून २२ जुगा-याविरुद्ध गुन्हा दाखल करून १२ जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून १ लाख १७ हजार रुपये रोख आणि इतर साहित्य असा एकूण ६ लाख ४५ हजाराचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई काल बुधवारी करण्यात आली.
मुळेगाव तांडा येथील दर्गाच्या पाठीमागे असलेल्या पत्राशेडमध्ये जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली. त्याप्रमाणे त्यांच्या पथकाने काल धाड टाकून सत्यजित पवार (रा. मुळेगाव तांडा) प्रेम बडेकर (रा.भवानी पेठ) जावेद विजापूरे (रा.शास्त्रीनगर) शिवशंकर मस्के (रा. सिद्धार्थनगर) सादिक बागवान (रा. शास्त्रीनगर) व्यंकटेश लेकरुवाळे रा.डफरीन चौक) हनुमंत पवार रा.साई बाबा चौक) स्वप्नील खैरमोडे (रा.शुक्रवार पेठ) जमीर बागवान (रा.लक्ष्मी मार्केट) आमिर उर्फ मुर्तूज शेख (रा.रविवार पेठ) पद्माकर कांबळे रा. दोड्डी) आणि संतोष राठोड (रा.मुळेगाव तांडा) अशा १२ जणांना अटक केली. तर इतर आरोपी पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले.
त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी १लाख १७ हजाराची रोकड, ११ मोटारसायकली, ५ मोबाइल आणि जुगाराचे साहित्य असा माल जप्त केला. त्यांच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी सहाय्यक निरीक्षक रवींद्र मांजरे, सहाय्यक फौजदार खाजा मुजावर, नारायण गोलेकर, मोहन मन्सावाले, अक्षय दळवी आणि समीर शेख यांनी केली.