सोलापूर – लक्ष्मी सहकारी बँकेतील ठेव रक्कमा मिळवण्यासाठी स्विकारण्यात येणाऱ्या अर्जास मुदतवाढ देण्यात आली असून आता १० डिसेंबरपर्यंत ठेवीदारांचे क्लेम फॉर्म्स स्विकारले जाणार आहेत, अशी माहिती बँक प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधानंतर बँकेवर प्रशासकाची नेमणूक झाल्यानंतर पाच लाख रुपयाच्या आतील ठेवी ठेवीदारांना डीआयजीसीकडून मिळवून देण्याचे काम प्रशासकीय मंडळाने हाती घेतले. त्यासाठीचे अर्ज देणे व स्विकारणेचे काम बँकेच्या सर्व शाखा कार्यालयात २२ डिसेंबरपासून सुरु झाले होते. याची अंतीम तारीख ५ डिसेंबरपर्यंत होती. ठेवीदारांची संख्या जास्त आहे.
यासाठी ठेवीदारांनी पहिल्याच दिवसापासून बँकेत गर्दी केली होती. ठेवीदारांची संख्या पहाता हि मुदत कमी पडेल म्हणून व ठेवीदार ठेवी परत मिळवण्यापासून वंचीत राहू नये, यासाठी बँकेच्या प्रशासकीय मंडळाने क्लेमफॉर्म सादर करण्याची मुदत येत्या १० डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. ठेवीदारांनी यांची नोंद घेवून आपले क्लेम फॉर्म योग्य त्या कागदपत्रासह या मुदतीत सादर करावेत, असं आवाहन प्रशासक मंडळाच्यावतीने करण्यात आलं आहे.
– रक्कम मिळविण्यासाठी ११ हजार जणांचे अर्ज
गैरव्यवस्थापनामुळे आर्थिक डबघाईस आलेल्या लक्ष्मी सहकारी बँकेच्या सुमारे ११ हजार ४९४ खातेदारांनी आपल्या खात्यावरील रक्कम मिळण्यासाठी अर्ज केल्याचे बँकेचे प्रशासक नागनाथ कंजेरी यांनी सांगितले.
पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण असून बँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली तरी ठेवी पथहमीतून खातेदारांना पाच लाखांची रक्कम मिळण्याची तरतूद आहे. ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी बँकेने १७ हजार ८०४ खातेदारांना आतापर्यंत अर्जांचे वाटप केले आहे. परंतु त्यातील ११ हजार ४९४ खातेदारांनी भरून दिलेल्या अर्जामध्ये १४ हजार ९५६ खात्यांचा समावेश असल्याची माहिती कंजेरी यांनी दिली.
ठेवी, बचत आणि चालू खात्यांची संख्या ९० हजार १४० असून सुमारे ५५ हजार खातेदारांची संख्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व खातेदारांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया राबविणे सोयीचे होणार आहे.
* मोहोळ पोलिसांनी तीन चोरट्याना ताब्यात घेऊन १२ दुचाकी
मोहोळ : मोहोळ येथील गुन्हे अन्वेषण विभागाने चोरीच्या बारा मोटारसायकली जप्त करून तीन युवकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर मोहोळ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक रात्रीच्यावेळी अनगर रोडवर गस्त घालत असताना २६ नोव्हेंबर च्या पहाटे तीन वाजण्याच्या तीन युवक एका विना नंबरच्या मोटरसायकलवर भरधाव वेगाने जात असताना पोलिसांनी पाहिले. त्या युवकांचा संशय आल्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते थांबले नाहीत. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीनच बळावला.
लोकनेते कारखाना सुरक्षा रक्षकांच्या मदतीने मोहोळ पोलिसांनी त्या युवकांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात यश आले. अधिक चौकशी केली असता त्यांची गाडी चोरीची असून अनगर येथूनच चोरी केली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून अधिक माहिती घेताना त्यांची त्यांची नावे विचारली असता राहुल विष्णू दांडगे (वय २४) , सागर चांगदेव अंकुश ( वय २८), सोहेल तूराब शेख (वय २४ रा. अनगर तालुका मोहोळ) सांगितले. या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या बारा मोटरसायकली जप्त केल्या.
ही कामगिरी मोहोळ पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन माने, हेड कॉन्स्टेबल पोलीसनाईक अमोल घोळवे, प्रवीण साठे , सिद्धनाथ मोरे महिला पोलीस नाईक अनुसया बंडगर यांच्या पथकाने केली.