हिंगोली : महाराष्ट्रातील हिंगोलीमध्ये गाढवाच्या दुधाची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. विशेष म्हणजे हे दूध १० हजार रूपये लीटरने विकले जात आहे. तर एक चमचा दुधासाठी १०० रूपये मोजले जात आहेत. तसेच हे दुध प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईतही हे दूध खूप प्रभावी आहे, असा दावा केला जात आहे. परंतु अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका, असा डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं आवाहन करण्यात येत आहे.
सोशल मीडियाच्या जमान्यात एखाद्या गोष्टीला रातोरात मोठी अमाप प्रसिद्धी मिळते. त्यासाठी लोक पैसे हातात घेऊन रांगाही लावतील. असाच काहीसा प्रकार हिंगोलीत घडलाय. हिंगोलीमध्ये गाढविणीचं दूध घेणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. मराठवाड्यातील जिल्ह्याचे शहर असलेल्या हिंगोलीमध्ये गाढवाचे दूध तब्बल दहा हजार रुपये लिटर विकले जाऊ लागले आहे आणि एवढे महागडे दूध घेण्यासाठी लोक रांगा लावत आहेत.
हिंगोलीत गाढवाच्या दुधाची गल्लीबोळात विक्री सुरू असून चमचाभर दूध प्या आणि सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळवा असा आवाज उठवला जात आहे. हे चमत्कारिक दूध असून हे पिण्याचे अनेक फायदे आहेत. मुलांना न्यूमोनिया होत नाही. याशिवाय ताप, खोकला, कफ यासारख्या आजारांच्या कोरोना रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम गाढविणीचं दूध करते, असा दावा दूध विक्रेते करत आहेत.
गाढवाचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, कोरोनापासून बचाव होतो, असा प्रचार सोशल मीडियावर झाला आणि गाढवाचे हे दूध घेण्यासाठी लोक गर्दी करू लागले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रांगा लावून गाढवाचे दूध खरेदी करू लागले. त्यामुळे झाले असे की सुरूवातीला अत्यंत कमी असलेल्या गाढवाच्या दूधाचा भाव रातोरात दहा हजार रुपये लिटरवर गेला. तरीही मोठ्या प्रमाणावर लोक या दूधाची खरेदी करत आहेत.
हिंगोलीमध्ये अनेक जण रस्त्यावर फिरून गाढवाच्या दूधाची विक्री करत आहेत. एक चमचा गाढवाचे दूध प्या आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळवा, अशी हाळी देत हे दूध विक्रेते रस्तोरस्ती फिरताना दिसत आहेत. गाढवाचे एक चमचा दूध मुलांना पाजले तर त्याला न्यूमोनिया होत नाही. सर्दी, ताप आदी आजारांपासूनही संरक्षण मिळते. एवढेच काय मद्यपान करून खंगलेल्यांचीही रोगप्रतिकारशक्ती भक्कम होते, असे दावे हे दूध विक्रेते करू लागल्यामुळे गाढवाचे दूध चांगलाच भाव खाऊन गेले आहे.
गाढवाच्या एक लिटर दूधाला दहा हजार रुपये मोजणे प्रत्येकाच्याच आवक्यात नाही. बहुतांश जणांना एवढी मोठी रक्कम मोजणे अशक्य असल्यामुळे दूध विक्रेत्यांनी त्यावरही उपाय शोधला आहे. त्यांनी चमचाने गाढवाचे दूध विकण्यास सुरूवात केली आहे. एक चमचा दूधासाठी तब्बल १०० रुपये मोजावे लागत आहेत.
गाढवाच्या दूधामुळे कोरोनापासून बचाव होतो, हा दावा डॉक्टरांना मात्र मान्य नाही. जर एखाद्याला कोरोनाची लागण झाली असेल तर त्याने तत्काळ वैद्यकीय सल्ला आणि उपचार घ्यावेत. गाढवाचे दूध घेतले म्हणजे आपल्याला काहीही होणार नाही, या भ्रमात राहणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.