नागपूर / अकोला : विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाने सत्ताधारी महाविकास आघाडीला धक्का देत बाजी मारली आहे. नागपूरात अपेक्षेप्रमाणे भाजपाचे उमेदवार माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विजयी झालेत. तर अकोला-वाशिम – बुलढाणा या मतदारसंघात भाजपा उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी या मतदारसंघातून यापूर्वी तीनवेळा विजय मिळवलेले शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांचा दणदणीत पराभव केला आहे.
दोन्ही ठिकाणच्या निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची मते फोडली आहेत. विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत विधानपरिषदेच्या सहा पैकी चार जागा बिनविरोध झाल्या होत्या.
मतदान झालेल्या नागपूर व अकोला- वाशिम – बुलढाणा या मतदारसंघाची मतमोजणी होवून आज निकाल जाहीर झाले. नागपूरच्या निवडणूकीत एकूण ५४९ मतदानापैकी भाजपा उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ तर काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली, तर भाजपातून काँग्रेसमध्ये येवून उमेदवारी मिळवलेल्या रवि भोयर यांना फक्त एक मत मिळाले. येथे भाजपाची ३१८ मते अधिकृत होती. भाजपाने येथे जवळपास ४४ मते फोडलीत. काँग्रेसने येथे निवडणूकीच्या आदल्या दिवशी अचानक आपला अधिकृत उमेदवार बदलला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अकोला- वाशिम – बुलढाणा या मतदारसंघातून भाजपा उमेदवार वसंत खंडेलवाल यांना ४४३ मते मिळाली तर विरोधी शिवसेनेचे उमेदवार गोपीकिसन बाजोरिया यांना ३३४ मते मिळाली. भाजपने येथे १०९ मतांनी विजय मिळवला. येथे कोणत्याही पक्षास बहुमत नसले तरी सेनेचे उमेदवार बाजेरिया यांनी येथून तीन वेळा विजय मिळवला होता. भाजपाची येथे फक्त २४६ मते होती. त्यांना महाविकास आघाडी व वंचीतची मोठी मते मिळाली.
अकोल्यात खंडेलवालांची शिवसेनेवर बाजी अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात झाली. बाजोरिया यांचा पराभव झाला आहे. अकोला बुलडाणा वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नव्हते.
शिवसेनेचे बाजोरिया हे गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघाचे आमदार होते. गेल्या १८ वर्षांनंतर इथे भाजपच्या उमदेवाराचा विजय झाला आहे. कोल्हापुरात सतेज पाटील बिनविरोध तर मुंबईतील विधान परिषदेच्या दोन जागाही बिनविरोध झाल्या आहेत. भाजपचे राजहंस सिंग आणि शिवसेनेचे सुनील शिंदे हे बिनविरोध आहेत. धुळे नंदुरबारमध्ये भाजपकडून माजी मंत्री अमरिश पटेल हे बिनविरोध झालेले आहेत.
महाविकास आघाडी सत्ताधारी असल्याने दोन्ही ठिकाणी आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असं बोललं जात असतानाच प्रत्यक्षात मात्र भाजपाने दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.