सोलापूर – सोलापूरमध्ये बोगस कंपनीच्या आधारे जप्त साखर कारखान्याची कोट्यावधींची मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न झाला आहे. यात लातूरच्या दोघाजणांविरूध्द सोलापुरात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नोंदणीकृत नसलेल्या कंपनीचे बनावट कागदपत्रे सादर करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची दिशाभूल केल्याप्रकरणी मुरूड (जिल्हा लातूर) येथील इंडस आरगो फार्मर कंपनीचे अमर साहेबराव मोरे आणि नितीन चांदमल सुराणा (दोघे रा.मुरुड जि. लातुर) यांच्याविरुद्ध फौजदार चावडीच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गोल्डफिंच पेठेतील डीसीसी बँकेत जुलै ते ऑगस्ट या दरम्यान घडली.
हातीज (ता. बार्शी) येथील आदित्यराज शुगर कारखान्याची स्थावर आणि जंगम मालमत्ता कर्जाची परतफेड न केल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने ताब्यात घेतली होती. त्या मालमत्तेची विक्री करण्यासाठी बँकेने जाहिरात काढली होती. ती मालमत्ता खरेदी करण्यासाठी चौघा जणांनी बॅकेत अर्ज केले होते.
त्यावेळी अमर मोरे यांनी आपली इंडस आरगो फार्मर ही कंपनी अस्तित्वात असल्याचे सांगून आपण त्या कंपनीचे मॅनेजर आहोत असे दर्शविले होते. त्यांनी 20 जुलै रोजी आपल्या कंपनीच्या लेटर पॅडवर ९ कोटी 55 लाख रुपयास मालमत्ता घेण्याचे ऑफर लेटर दिले होते. त्यावेळी श्रीवर्धन ॲग्रोचे (औरंगाबाद) किशन कांगणे यांनी देखिल मालमत्ता घेण्यासाठी बँकेला ऑफर दिली होती.
मात्र जप्त मालमत्ता खरेदी करण्याचे टेंडर मुरुडचे फार्मर कंपनीला मिळाले होते.असे असताना त्यांनी 25% रक्कम देखील बँकेत भरणा केला नाही. त्यांची कंपनी अस्तित्वात नाही. बनावट आणि खोट्या कागदपत्राद्वारे त्यांनी ऑफर लेटर देऊन बँकेची दिशाभूल करीत मालमत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला, अशा आशयाची फिर्याद श्रीवर्धन ॲग्रो कंपनीचे किसन एकनाथराव कांगणे (रा. गजानन नगर, औरंगाबाद)यांनी पोलिसात दाखल केली. त्याप्रमाणे पोलीसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे फोजदार मोहन पवार हे करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बार्शी तालुक्यातील हत्तीज येथील आदित्यराज शुगर प्रा. लि. ची मालमत्ता कर्ज थकबाकीमुळे जप्त केली होती. बँकेने या साखर कारखान्याची मालमत्ता विक्रीस काढण्याचे ठरवून त्यासाठी जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यानुसार ही मालमत्ता विकत घेण्यासाठी औरंगाबादच्या श्रीवर्धन कंपनीसह इतर काही कंपन्या पुढे आल्या होत्या. बँकेने संबंधित मालमत्तेची विक्री मूल्य ८ कोटी १६ लाख १७ हजार रूपये निश्चित केले होते. श्रीवर्धन कंपनीने संबंधित मालमत्ता खरेदीसाठी ९ कोटी ३० लाख रूपयांचा प्रस्ताव दिला होता.
* शहा नगरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – वांगीरोड परिसरातील शहानगर हाऊसिंग सोसायटीत राहणाऱ्या अश्विनी सचिन गायकवाड (वय ३६) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. अश्विनी गायकवाड हिने घरातील छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतली होती. तिला फासातून सोडवून नितीन गायकवाड (दीर) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र ती उपचारापूर्वीच मयत झाली या घटनेची नोंद सलगरवस्ती पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार पवार पुढील तपास करीत आहेत.