बुलडाणा : राज्यात आज नगरपंचायतीच्या निवडणुकींसह ग्रामपंचायतीच्याही पोटनिवडणुका होत आहे. त्यातच बुलढाण्यातील जलंब ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला असून गावात पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जलंब ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झाले. याचवेळी केंद्रावर जलंब येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून यात चार जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. या जखमींवर शेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राज्यात आज जिल्हा परिषदेच्या 39, तर पंचायत समितीच्या 79 निर्वाचक गणांसाठी मतदान झाले आहे. एकूण, 7 लाख 68 हजार 866 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 1322 मतदान केंद्रावर मतदान झाले. शिवाय, आज 32 जिल्ह्यातील 105 नगरपंचायत निवडणुकांसाठीही मतदान झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी मतदान सुरू झाले. सकाळीच दोन गटात सुरुवातीला बाचाबाची झाली आणि नंतर अचानक एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला केला. त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. सध्या गावात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलाय. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील दोन नगरपंचायतीसाठी मतदान सुरू झालेय. मोताळा व संग्रामपूर या दोन नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. भाजप , शिवसेना , काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पक्षाची सरळ लढत आहे.
दरम्यान, नाकाबंदी कारवाईत दहा लाखाच्या गांजासह दोन दुचाकी जप्त केला. परराज्यातून जिल्ह्यामध्ये गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी किन्ही महादेव फाटा परिसरात नाकाबंदी केली होती. नाकाबंदीदरम्यान पोलिसांना दोन दुचाकी समोरून येताना दिसल्या.
पोलिसांनी या दुचाकींना थांबवून झडती घेतली. या झडतीमध्ये तब्बल एक क्विंटल गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. या गांजाची किंमत अंदाजे दहा लाखांच्या घरात आहे. आरोपींकडून एक क्विंटल गांजासह दोन दुचाकी, तीन मोबाईल असा एकूण 10 लाख 81 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.