सोलापूर – सोलापूर शहराची “लक्ष्मी” म्हणून ओळख असलेली व सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीचा सामना करत असलेली लक्ष्मी बँक वाचविण्यासाठी येत्या ९ जानेवारी रोजी सर्व सभासदांची एकत्रित बैठक घेण्याचा निर्णय मंगळवारी नागेश करजगी ऑर्किड स्कूल येथील सभागृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
कामगार नेते कुमार करजगी तसेच डॉक्टर सतीश वळसंकर यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला बँकेचे माजी संचालक कमलाकर कुलकर्णी, विष्णू मोंढे, अजय पोन्नम, विजय जाधव, मधुकर जैन, विश्वेन्द्र मोरे, दिलीप पोटाबत्ती, शावरू राठोड, योगेश मार्गम, दिलीप कुलकर्णी, प्रवीण मुसपेठ, विजय चिंता यांच्यासह बँकेचे सभासद उपस्थित होते.
लक्ष्मी बँकेने दिलेल्या कर्जामुळे अनेकांनी मोठे उद्योग उभारले तर शिक्षणासाठी दिलेल्या कर्जामुळे अनेक कर्जदारांची मुले चांगल्या पदावर नोकरीला गेली, ही लक्ष्मी बँकेची खरी ओळख आहे. आता बँक अडचणीत असताना बड्या थकबाकीदारांनी थकबाकी भरण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले.
बँक अडचणीत येण्याला छोटे खातेदार किंवा छोटे कर्जदार नसून मोठे थकबाकीदार कारणीभूत आहेत. या मोठ्या थकबाकीदारांनी पुढे येऊन बँकेला साथ देण्याचे ठरवले तर बँक बुडण्यापासून वाचणार आहे, असे माजी संचालक कमलाकर कुलकर्णी यांनी सांगितले.
कर्जदारांनी कोरोना महामारीचे कारण पुढे करत कर्जाचे हप्ते भरण्यास नकार देणे अत्यंत चुकीचे आहे. आजही त्यांचे व्यवसाय उत्तमच चालत असताना त्यांनी हे कारण सांगणे चुकीचे आहे. जर मोठे थकबाकीदार आपले हप्ते आणि रकमा भरण्यास तयार झाले तर बँक खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा लक्ष्मी म्हणून सर्वांच्या सोबत राहील, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
बँकेने दिलेली शंभर टक्के कर्जेही सुरक्षित असून खातेदारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे सांगत प्रशासकाने अद्यापही सौम्य भूमिका ठेवली असल्याचेही कुलकर्णी म्हणाले.
लक्ष्मी बँक ही सोलापुरातील नावारूपाला आलेली एक अत्यंत चांगली बँक आहे. ९३ वर्षे या बँकेने सेवा दिली आहे. ही सर्व सभासदांसाठी जमेची बाजू आहे. आपण जरी या बँकेचा सभासद नसलो तरी लक्ष्मी बँकेविषयी आपल्याला आस्था आहे आणि यापोटी आज कुमार करजगी यांनी बोलावलेल्या बैठकीला आलो. बँक वाचविण्यासाठी मदत करण्याची तयारी असल्याचे विष्णू मोंढे यांनी सांगितले.
लक्ष्मी बँक वाचलीच पाहिजे, यासाठी आज प्राथमिक बैठक बोलविण्यात आली. पहिल्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार येत्या ९ जानेवारी रोजी सर्व सभासदांची एकत्रित बैठक ऑर्किड स्कूलमध्ये घेणार असल्याचे कुमार करजगी आणि डॉ. सतीश वळसंगकर यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
○ ठेवीदारांना जानेवारीत मिळणार १८६ कोटी रुपये
सालापूर – आर्थिक अडचणीत आलेल्या लक्ष्मी सहकारी बँकेच्या १६ हजार ४०५ ठेवीदारांना जानेवारीत ठेवी विमा व पतहमी महामंडळाकडून १८६ कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती बँकेचे प्रशासक नागनाथ कंजेरी यांनी दिली.
कर्जदारांनी कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक आर्थिक अडचणीत सापडली असून रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक केली आहे. बँकेतील पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण असून विमा महामंडळाकडून ठेवीची रक्कम मिळवून देण्यासाठी प्रशासकांनी ठेवीदारांकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
पाच लाखांपर्यंत ठेवी असलेल्या खातेदारांची संख्या ७५ हजार २६९ असून त्याची रक्कम २०२ कोटी १६ लाख आहे. त्यापैकी बँकेकडे १६ हजार ४०५ खातेदारांनी केवायसी असलेले पूर्ण अर्ज भरून बँकेकडे सादर केले आहेत. अजूनही ५८ हजार ८६४ खातेदारांनी अर्ज भरून दिलेले नाहीत. पूर्ण अर्ज भरून दिलेल्या १६ हजार ४०५ खातेदारांच्या प्रस्तावाची सनदी लेखापालाकडून पडताळणी करून ठेवी विमा व पतहमी विमा महामंडळाकडे सादर केला आहे. त्यामुळे नव्या वर्षात या खातेदारांच्या बँक खात्यात १८६ कोटी रुपये जमा केले जाणार असल्याचे कंजेरी म्हणाले.
पाच लाखांपेक्षा अधिक ठेवी असलेल्या खातेदारांची संख्या ५५८ असून त्यांची रक्कम १४.७७ कोटी रुपये आहे. या ठेवीदारांची रक्कम मिळवून देण्यासाठी प्रशासकाकडून प्रयत्न केले जात आहेत. थकबाकीदारांकडून वसुली करून त्यांची रक्कम त्यांना दिली जाणार आहे.
ज्या खातेदारांनी अजूनही ठेवी मिळविण्यासाठी अर्ज भरून दिले नाहीत त्यांच्यासाठी आणखी एक संधी दिली जाणार आहे. त्याचा खातेदारांनी लाभ घेऊन बँकेकडे केवायसीसह अर्ज सादर करावा, असे आवाहन कंजेरी यांनी केले आहे.