मुंबई : संगीतकार आणि गायक बप्पी लहरी (वय – 70) यांचं मुंबईत निधन झालं आहे. मुंबईतल्या रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. PTI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. आज बॉलिवूडचा हा सोनेरी आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे.
संगीतकार बप्पी लहरी हे त्यांच्या संगीतासाठी आणि गाण्यांसाठी जेवढे प्रसिद्ध होते तेवढेच त्यांच्या गोल्डन अवतारासाठीही. खास प्रकाराचे सूट त्यावर सोन्याच्या चेन, काळा गॉगल हा त्यांचा लुक खास प्रसिद्ध होता. बॉलिवूडला डिस्को आणि पॉप संगीताची ओळख करून देणारा हा कलाकार आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
बप्पी लाहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 ला पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी मध्ये झाला होता. 2021 मध्ये त्यांना कोरोनाही झाला होता. मात्र कोरोनावर त्यांनी यशस्वीरित्या मात केली. तम्मा तम्मा लोगे, डिस्को डान्सर, याद आ रहा है.. तेरा प्यार ही आणि यासारखी अनेक सुपरहिट गाणी बप्पीदांनी गायली आहेत. बप्पी लाहिरी यांचं मूळ नाव आलोकेश लाहिरी असं होतं.
1973 मध्ये ‘नन्हा शिकारी’ सिनेमात गाणं गाण्याची संधी त्यांना मिळाली होती. मात्र त्यानंतर 1975 मध्ये ‘जख्मी’ या सिनेमातून त्यांना खरी ओळख मिळाली. या सिनेमातून त्यांनी मोहम्मद रफी आणि किशोर कुमार सारख्या महान गायकांसोबत गाणं गायलं होतं. बप्पी लहरी आणि मिथुन चक्रवर्ती यांची जोडी चर्चेत राहिली. एकीकडे मिथुन यांचा डान्स तर बप्पी लहरी यांची पॉप, डिस्को गाणी असं कॉम्बिनेशन चांगलच रंगलं होतं. Bollywood’s Goldman lost, Bappi Lahiri dies in Mumbai
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
बप्पी लहरी यांच्या काही हिट गाण्यांपैकी ‘याद आ रहा है’, ‘सुपर डान्सर’, ‘बॉम्बे से आया मेरा दोस्त’, ‘ऐसे जीना भी क्या जीना है’, ‘प्यार चाहिए मुझे जीने के लिए’, ‘रात बाकी’, ‘यार बिना चैन कहा रे’, ‘उह ला ला उह लाला’ ही आणि इतर बरीच गाणी आहेत. 80 आणि 90 च्या दशकातला काळ त्यांनी त्यांच्या गाण्यांनी चांगलाच गाजवला होता. हिंदीसह त्यांनी बंगाली, गुजराती, तामिळ, तेलुगू, कन्नड गाणी देखील गायली आहेत.
आत्तापर्यंत त्यांनी गायन आणि संगीत क्षेत्रातील काम सुरु ठेवलं होतं. 2020 मध्ये ‘बागी 3’ सिनेमातील भंकस हे गाणं त्यांचं हिंदी सिनेसृष्टीतील शेवटचं गाणं ठरलं. बप्पी यांच्यावर अनेक पुरस्कारांचाही वर्षाव झाला. 63 व्या फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात त्यांना संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
□ बप्पी लहरी यांनी दिलं होतं मराठी चित्रपटाला संगीत
– प्रसिध्द संगीतकार बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. ते 69 वर्षांचे होते. त्यांनी बॉलीवूड बरोबरच मराठी चित्रपटासाठी संगीत दिलं. जख्मी हिंदी चित्रपटानंतर बप्पीदा यांनी मराठी चित्रपटासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर मराठी चित्रपट ‘डोक्याला ताप नाही’ यासाठी बप्पीदा यांनी संगीत दिलं. तसेच दिग्दर्शक संजय जाधव यांच्या लकी चित्रपटासाठीही बप्पीदांनी गाणं गायलं.
□ सोनं माझ्यासाठी लकी
तुम्ही एवढे सोन्याचे दागिने का घालता? असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीत विचारला होता. यावर उत्तर देताना, हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता एल्विस प्रेस्ली हा माझा आवडता कलाकार असून तो कायम सोन्याची चेन घालतो. त्याला पाहून मला कायम प्रेरणा मिळत राहिली. इतकंच नाही तर, जर मी जीवनात यशस्वी झालो तर माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करेन असं ठरवलं होतं. त्यातच मला असं वाटतं की सोनं माझ्यासाठी लकी आहे. त्यामुळेच मी कायम सोनं घालतो आणि त्यामुळेच गाण्यासोबत माझी वेगळी ओळखही झाली आहे, असं बप्पीदांनी सांगितलं होतं. आज बॉलिवूडचा हा सोनेरी आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे.