□ महात्मा बसवेश्वर व संत चोखामेळा स्मारक येत्या काळात होणार पूर्ण
□ उपमुख्यमंत्री फडणवीसांची आवताडे शुगरचा गळीत हंगाम शुभारंभास उपस्थिती
मंगळवेढा – गेले अनेक वर्षे ज्या जोरावर निवडणुका होत होत्या तो मंगळवेढा 24 गाव सिंचन योजनेला गती देऊन सर्व मान्यता घेतल्या असून नवीन दर सूचीप्रमाणे येत्या कॅबिनेटमध्ये या योजनेला मान्यता देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवेढ्यात आज केली.
आवताडे शुगर डिस्टिलरीज् प्रायव्हेट लिमिटेड नंदूर येथे प्रथम गळीत हंगाम शुभारंभ व शेतकरी मेळाव्याप्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, रणजितसिंह मोहिते पाटील, शहाजी पाटील, सुभाष देशमुख, राम सातपुते हे आमदार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले , आमदार. समाधान आवताडे यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जात आहेत. महात्मा बसवेश्वर व संत चोखामेळा स्मारक येत्या काळात पूर्ण होणार आहे. या सर्व मागण्या पूर्ण करून परत निवडणुकीसाठी ताठ मानेने निवडून येता येईल, असे काम समाधान आवताडे करत आहेत.
खासदार निंबाळकर यांची आग्रही मागणी असणारा पंढरपूर ते फलटण रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यासाठी येत्या आठ दिवसात निर्णय घेणार आहे. आज कार्तिक वारी निमित्ताने विठ्ठलाचे आशीर्वाद घेऊन अतिशय पुण्य कार्य करून मी आवताडे शुगर येथे आलो आहे. पांडुरंग हा सामान्य माणसाचा, कष्टकरी शेतकर्यांचा देव आहे. त्यांना सुजलाम सुफलाम करा, असे साकडं विठ्ठलाला घातले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
साखर कारखानदारीबाबत बोलताना ते म्हणाले, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे सध्या कारखानदारी जिवंत आहे. एफआरपी वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. साखरेला एसएमपी देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. साखरेचे दर म्हणजे एसएमपी वाढविल्याने शेतकरी व कारखानदारांना फायदा झाला आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, उजनीच्या पाण्यावर अधिकार सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांचा आहे. त्यामुळे हे पाणी आता कोणी पळवून घेऊन जाणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या अथक परिश्रम व आशीर्वादाने हा कारखाना मंगळवेढा येथील शेतकर्यांसाठी समाधान आवताडे यांनी सुरू केला आहे. पंढरपूर मतदारसंघाच्या विकासासाठी आ.आवताडे यांनी खूप निधी खेचून आणला असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार आवताडे म्हणाले , आवताडे शुगर हा केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच सुरू झाला आहे. हजारो कामगारांच्या हाताला काम देणारी ही संस्था बंद पडता कामा नये. तालुक्याच्या विकासाला चालना देण्यासाठी 718 कोटी रूपयांचा निधी पाणी उपसा सिंचन योजनेस मिळणार असून या मतदारसंघावर देवेंद्र फडणवीस साहेबांचे अत्यंत बारीक लक्ष आहे. या योजनेतील अनेक त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले व येणार्या काळात आपल्या हस्ते या योजनेचे उद्घाटन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रावर कोल्हापूर पद्धतीचे बॅरेजस, मंगळवेढा व पंढरपूर येथील ग्रामीण रुग्णालय, पंढरपूर एमआयडीसीचा प्रकल्प, मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारक व संत चोखामेळा स्मारक हे प्रश्न मार्गी लावावावे, अशी मागणीही समाधान आवताडे यांनी केली.