□ कारण गुलदस्त्यात; तर्कवितर्काना उधाण
सोलापूर : माढा येथील राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आज शुक्रवारी भेट घेतल्याने पुन्हा एकदा बबनदादा भाजपचा रस्ता धरणार का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. MLA Babandada met Devendra Fadnavis Babanrao Shinde politics Madha Pandharpur
गेल्या काही महिन्यांपासून बबनदादा शिंदे आणि माजी आमदार राजन पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. राजन पाटील हे वारंवार भाजपमध्ये जाण्याचे संकेत देत आहेत. असे असतानाच आता बबनदादा शिंदे यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याने तेही आता भाजपचा रस्ता धरणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
बबनदादा यांच्या हालचाली पाहून माढा नगरपालिकेच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाप्रसंगी दस्तुरखुद्द शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. बबनदादा यांनी भाजपमध्ये जाऊ नये यासाठीच राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हा प्रयत्न होता. मात्र आता बबनदादा शिंदे यांनी पंढरपूर दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन एक प्रकारे भाजपमध्ये जाणार असल्याचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे.
पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह आणि पंतनगर येथील आमदार प्रशांत परिचारक यांच्या घरीही बबनदादा उपस्थित होते. नेमके ते कोणत्या कारणासाठी भेटले आहेत याची माहिती उपलब्ध झाली नसली तरी ते त्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्यासमवेत पालकमंत्री विखे पाटील खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह प्रशांत परिचारक उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीला माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदेंनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा संदर्भात शासकीय विश्रामगृहावर विविध शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी समवेत बैठक ही बैठक होती. मागील वेळेस बबनराव शिंदेंनी दिल्लीत फडणवीसांची भेट घेतली होती. त्यावेळी ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वोत्तम नियोजन करावे. वारकरी, भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने संबंधितांनी प्रारूप आराखडा अंतिम करताना सर्वंकष, परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूसंपादन करताना, निकषाच्या बाहेर जाऊन बाधितांचे पुनर्वसन करण्याची ग्वाही आज पंढरपुरात दिली.
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे झालेल्या या बैठकीस महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सर्वश्री रणजितसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, बबनराव शिंदे, राम सातपुते, शहाजीबापू पाटील, सुभाष देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, प्रांताधिकारी गजानन गुरव आदि उपस्थित होते.
भूसंपादनासाठी आवश्यक जमिनीची मोजणी करून प्रस्ताव तयार करावा. भूसंपादन लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्थानिकांचे पुनर्वसन करताना ज्यांचा व्यवसाय आहे, त्यांना तिथेच प्राधान्याने जागा देऊ. रहिवाशांना बहुमजली इमारतीत घरे आणि मोकळा प्लॉट किंवा भरीव नुकसान भरपाई देण्याचा विचार करण्यात येईल. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी नागरिकांशी चर्चा करून पंढरपूरचा चांगला विकास करण्यासाठी सुवर्ण मध्य साधावा, असे ते म्हणाले.