वेळापूर : फळवणी (ता. माळशिरस) येथे पहाटेच्या सुमारास फळवणी गावालगत रोड क्रॉस करताना वाघ दिसल्याने व त्याने एक कालवड व कुत्रा खाल्ल्याने फळवणी, कोळेगाव, तांदुळवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माळशिरस तालुक्यातील फळवणी येथील सांगोला वेळापूर रोड वर गावालगत विशाल दूध संकलन केंद्र फळवणी याच्या शेजारी काॅर्नरला राहत असलेले शेतकरी नारायण प्रल्हाद अवताडे यांच्या रानात गुरूवारी (दि. ३) सकाळी घरालगत तीन कालवडे रानात बांधल्या होत्या. त्यांची पत्नी सायंकाळी ६.०० सुमारास ती कालवडे घरी आणण्यासाठी गेली असता एक बारा महिन्याचे कालवड फाडून खाल्ले असल्याचे आढळून आले.
शेजारी सांडलेले रक्तही ताजे होते. यावरून नुकतेच कालवड खाल्याचा गोंधळ झाला. गेल्या दोन दिवसापासून फळवणी परिसरात वाघ फिरत असल्याची ग्रामस्थांमधून चर्चा ऐकण्यास मिळत होती. त्यातच आज गुरूवारी (दि. ४) पहाटेच्या सुमारास रात्री २.३० च्या सुमारास एका व्यक्तीस दिसला. शिंदे नामक हे आपल्या चार चाकी गाडीतून नातेवाईकासह सांगोल्याहून फळवणी मार्गे आपल्या बावडा (ता. इंदापुर ) या गावी चालले होते. त्यांना फळवणी गावाहून पुढे जाताना गावाच्या कॉर्नरला रोडच्या आतल्या बाजूला काहीतरी उभा असल्याचे त्यांना जाणवले. त्या क्षणी काही अंतरावर चारचाकी वाहन थांबवून त्यांच्या नातलगाला वाघ असल्याचे दाखवून गाडी थांबवली आणि मोबाईलमधील व्हिडिओ चालू करून वाघाला कॅमेर्यात कैद केले.
काही सेकंदातच रोडच्या अलीकडल्या बाजूने वाघ रोड क्राॅस करून नारायण प्रल्हाद आवताडे यांच्या शेताच्या बाजुला गेला असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून आले. शिंदे पाहुण्यांनी त्यांचे फळवणी येथील पाहुण्याला त्या क्षणाला तो व्हिडिओ पाठवून तुमच्या गावांमध्ये फळवणी कॉर्नरला वाघ दिसला असल्याचे सांगितले.
त्यानंतर ज्या पाहुण्याला फोन केला आहे त्यांनी तो व्हिडिओ पाहून फळवणी गावचे सरपंच सचिन पाटील, फळवणीचे पोलीस पाटील माया गणेश अवताडे यांना व्हिडिओ पाठवून वाघ फळवणी गावाजवळ आला असल्याची माहिती दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मोबाईल कॅमेर्यात कैद झालेल्या वाघासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
त्यानंतर गावात गोंधळ निर्माण झाला. सकाळी थोडे उजाडल्यानंतर गावचे सरपंच सचिन पाटील, पोलीस पाटील माया अवताडे, गणेश अवताडे व काही शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणचा व्हिडिओ आहे तो पाहिला आणि जागेची पाहणी केली असता तो काढलेला व्हिडिओ आणि ती जागा बरोबर होती. येथूनच वाघाने रोड क्रॉस करून नारायण प्रल्हाद अवताडे यांच्या शेतालगत रानात गेला असल्याचे खात्री झाली. पोलीस पाटील माया गणेश आवताडे यांनी ग्राम सुरक्षा कॉलवरून फळवणी गावातील सर्व ग्रामस्थांना, रानातील शेतकऱ्यांना फळवणी गावाजवळ वाघ आला असून सर्वांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
दरम्यान नारायण प्रल्हाद अवताडे यांच्या कालवडावर झालेला हल्ला व त्याचबरोबर पहाटेच्या सुमारास शेतकरी अवताडे यांचे बंधू नानासाहेब आवताडे यांचे कुत्र्यावर पहाटेच्या सुमारास हल्ला करून त्याला मारले आहे ही दोन्ही ठिकाणे जवळ जवळ असून ही घटना पाहण्यासाठी सकाळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
या घटनेची माहिती पोलीस पाटील माया गणेश आवताडे यांनी वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस प्रभारी अधिकारी निलेश बागाव व माळशिरस वनपरिक्षेत्र अधिकारी दयानंद कोकरे यांना दिली होती. या दोन्ही अधिका-यांनी घटनास्थळास भेट दिली. ज्या ठिकाणाहून वाघ क्रॉस झाला होता त्या ठिकाणची पाहणी करून खात्री करून घेतली. यावेळी वनविभागाचे दयानंद कोकरे तसेच निलेश बागाव यांनी ज्याठिकाणी वाघाने हल्ला केला होता त्या ठिकाणाची पाहणी केली.
यावेळी फळवणी गावचे सरपंच सचिन पाटील, पोलीस पाटील माया गणेश आवताडे पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वाघमोडे, तसेच वनरक्षक पिलीव गणेश जगदाळे, मळोली वनरक्षक भोजने एस एस ,पाणी वाटप संस्था चेअरमन जाधव, फळवणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
□ सर्वांनी काळजी घ्यावी !
दयानंद कोकरे आणि निलेश बागाव यांनी फळवणी ग्रामस्थांना आपल्या ८ किलोमीटरच्या परिसरात हा वाघ फिरत आहे. रानात एकट्याने जाऊ नये, रानातील वस्तीवरील रात्रीच्यावेळी सर्वांनी सावधानता बाळगावी. फळवणी परिसरात आलेल्या ऊस तोडणी कामगारांनी दक्षता घेण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी दयानंद कोकरे, वेळापूर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी निलेश बागाव यांनी केले.