□ जिल्ह्याला उपऱ्याच पालकमंत्र्यावर मानावे लागणार समाधान
सोलापूर / अजित उंब्रजकर
सोलापूर शहर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री नेते राधाकृष्ण विखे – पाटील यांची नेमणूक होऊन बराच काळ उलटून गेला आहे. तरी पालकमंत्री म्हणून नियुक्त झाल्यावर त्यांनी सोलापूर शहराला एकदाच भेटी दिली. मंत्र्यांच्या या भेटीला महिना उलटून गेला आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबणीवर पडत आहे. त्यामुळे आणखी महिने दोन महिने तरी सोलापूर शहर आणि जिल्ह्याला उपऱ्याच पालकमंत्र्यावर समाधान मानावे लागणार आहे. Solapur. A month ago, the visit of the guardian minister took place; Additional satisfaction pending strategic decisions
जिल्ह्याच्या राजकारणात व प्रशासकीय कामकाजात पालकमंत्री राजा मानला जातो. सरकारच्या सर्व योजनांची जिल्ह्यातील अंमलबजावणी पालकमंत्र्यांशी निगडीत असते.
महाविकास आघाडीचे सरकार असताना सोलापूर शहर आणि जिल्ह्याला तब्बल तीन पालकमंत्री मिळाले होते, तेही परजिल्ह्याचे होते. त्यानंतर भाजपची आणि शिंदे गटाची सत्ता आल्यानंतरही सोलापूर शहर आणि जिल्ह्याला बाहेरचेच पालकमंत्री मिळाले, पण आपल्या शेजारचे. हीच समाधानाची बाब होय. पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर ते ४ ऑक्टोबर रोजी शहरात आले होते. त्यावेळी त्यांच्या हस्ते काही विकास कामांचे उद्घाटन आणि जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती.
मात्र आज त्याला तब्बल महिना उलटून गेला तरी पालकमंत्री अद्याप सोलापूरकडे फिरकलेले नाहीत. जिल्ह्याच्या विकासासंदर्भातील काही धोरणात्मक निर्णयात पालकमंत्र्यांची संमती आवश्यक असल्याने काही विषय प्रलंबित आहेत. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील मंत्र्याची पालकमंत्री नियुक्ती अडचणीची ठरू लागल्याचे चित्र आहे.
विखे-पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या नगरमध्ये त्यांनी जोरदार काम सुरू केले आहे. तेथे जनता दरबार, संपर्क कार्यालय सुरू झाले आहे. सोलापूर जिल्ह्याला त्यांनी वा-यावर सोडल्याची स्थिती आहे.
■ कार्यकर्ते कमिट्यांबाबत आशादायी
राज्य सरकारमधील विविध विभागांशी संबंधित जिल्ह्यातील कामे करून घेण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची असते. यासाठी बहुतांश विभागाच्या स्थानिक स्तरावर शासकीय समित्याही असतात. अशा समित्यांतून अशासकीय सदस्य पालकमंत्रीच नियुक्त करतात.
आता राज्यातील नव्या सरकारने पूर्वीच्या समित्याही बरखास्त केल्या आहेत. त्यावर आपली वर्णी लागावी म्हणून भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते प्रतीक्षेत आहेत. मात्र पालकमंत्री सोलापूरला आल्यावरच या विषयाला मुहूर्त लागणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
■ आदित्य ठाकरे उद्या सोलापूर दौऱ्यावर
सोलापूर : गुवाहाटीफेम शहाजी पाटील हे सध्या शिंदे गटाकडे गेले आहेत. सातत्याने ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीतील नेत्यांवर टीका करीत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्याच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून सरकारकडे मदतीची मागणी करण्यासाठी आदित्य ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
जुलै ते ऑक्टोबर या काळातील अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अजून सप्टेंबर व ऑक्टोबरमधील बाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही.
या पार्श्वभूमीवर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे उद्या बुधवारी (ता. ९) सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. सांगोल्यातील बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून ते जेजुरीला जाणार आहेत.
‘एसडीआरएफ’ निकषात बदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भरपाई मिळेल, अशी ग्वाही दिली होती. पण, सोलापूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना ऑगस्टमधील नुकसानीपोटी (अतिवृष्टी व सततचा पाऊस) १४७ कोटी दिले. तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाला. परंतु, सप्टेंबर व ऑक्टोबरमधील भरपाई अजून मिळालेली नाही.
जिल्हा प्रशासनाने सप्टेंबर व ऑक्टोबरमधील अतिवृष्टीच्या भरपाईपोटी ३६ कोटी आणि सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्यांसाठी पावणेसहा कोटींची मागणी केली आहे. त्यात सांगोला, दक्षिण सोलापूर, करमाळा, माढा, मंगळवेढा तालुक्यातील अतिवृष्टी बाधितांचा आणि बार्शी व अक्कलकोट वगळता अन्य तालुक्यांमधील सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा असल्याची माहिती सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी दिली.
□ शहाजीबापू म्हणतात राष्ट्रवादी काँग्रेसमधील 12 आमदार बाहेर पडणार
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील 12 आमदार लवकरच बाहेर पडणार असल्याचे विधान शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष मुख्यमंत्री राहून काम करता आले नाही. त्यामुळे आमदारांमध्ये असंतोष पसरला. प्रत्येक आमदार, नेता स्वत:चं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतो. अजित पवार हे मोठे राजकारणी, 95 साली कुठे गेले होते. त्यावेळी सरकार पडले नाही. शिवसेना-भाजपा मिळून 100 जागा नव्हत्या. आता 170 जागा आहेत. त्या पाडायला निघाल्यात. त्यांच्या विधानाकडे लक्ष देण्याची गरज नाही असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं.
सोलापुरात एके ठिकाणी शहाजीबापू पाटील म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात यासाठी बोलले जाते, कारण राष्ट्रवादीतील 12 नेते फुटलेले आहेत. पण ज्याचा त्याचा मुहूर्त ठरायचा आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोठ्यातील मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीला दणका बसणार आहे. सोलापुरातील हा नेता फुटणार आहे. जरा थांबा. ठरवून सगळे शिजवून झालेले आहे. फक्त झाकण उघडायचे आणि वाढायचे आहे, असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.
शहाजी पाटील म्हणाले की, सरकार पाडण्याची भाकीते अनेकदा केली आहेत. 95 साली मी काँग्रेसचा आमदार होतो. त्यावेळी 5 वर्ष शरद पवार आम्हाला सांगायचे पुढच्या महिन्यात सरकार पडणार आहे. परंतु मनोहर जोशी, नारायण राणेंचे सरकार काही पडले नाही. आम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागेल. आताही सरकार पडणार असे विधान करून यांच्या पक्षातील नेते भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना यात येणार आहेत त्यांना अडवण्यासाठी भीती निर्माण करत आहे असं त्यांनी सांगितले.