□ गटशिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, निनावी पत्राचा बाँब
□ प्रशासनाची बघ्याची भूमिका, काका साठेंमुळे झाला स्फोट
सोलापूर : गेल्या सहा ते सात महिन्यांचा कालावधी. ‘ते जिल्हा परिषदेतील एक गटशिक्षणाधिकारी एका शिक्षक महिलेला देताहेत त्रास. तिने शिक्षणाधिकाऱ्यांपासून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांकडेच केल्या तक्रारी. पण प्रशासन बसले गप्प. त्यात मुख्याध्यापिकेमार्फत निरोप आला, ‘मॅडम, बाईंना घेऊन फराळाला बंगल्यावर या. ‘ती शिक्षिका खवळली. पुढे काय झाले ते वाचा… Solapur Zilla Parishad was shaken after reading the letter; Madam, Uncle Dilip Swami came to the bungalow with his wife
त्या महिलेने स्वत:चे स्वत्व टिकवण्यासाठी तिने थेट जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते काका साठे यांनाच निनावी पत्र लिहिले. ते पत्र साठेंनी आणून थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या टेबलवर टाकले. तेच पत्र पत्रकारांना देत ‘यावर बातमी करा’ असे सांगत स्फोट केला आणि बघ्याची भूमिका घेणारी जिल्हा परिषद हादरली.
हा सगळा प्रकार घडला आहे बुधवारी दुपारी. जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते बळीरामकाका साठे तावातावाने जिल्हा परिषदेत आले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात गेले आणि तितक्याच तावातावाने बाहेर आले. त्यांचा तो ताव पाहून काही तरी गडबड असावी, अशी शंका आली म्हणून माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना हटकले. त्यावेळी त्यांनी एक पत्रच माध्यमांसमोर ठेवले आणि म्हणाले, ‘हे वाचा आणि याची बातमी करा.’ जेव्हा ते पत्र वाचले गेले; तेव्हा एक गटशिक्षणाधिकारी एका शिक्षक महिलेला कशापध्दतीने नको तो त्रास देतात, हे उघड झाले आणि सगळेच हादरून गेले.
□ गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कामगिरीचे फुटले बिंग
संबंधित शिक्षिकेने मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना २२/१०/२०२२ रोजी पत्र पाठवून त्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचा ‘पराक्रम’ कळवला होता. शिवाय तत्कालीन शिक्षणाधिकारी लोहार यांच्याकडेही तक्रार केली होती. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखलच घेतली नाही.
शिक्षणाधिकारी तर लाच प्रकरणात अडकले. त्यामुळे संबंधित शिक्षिकेने शेवटी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह बळीराम साठेंनाही निनावी पत्र लिहिले आणि साठेंमुळे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कामगिरीचे बिंग फुटले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ बंगल्यावर या… घरी कोणी नाही
तिकडे जि.प. प्रशासनाने २२ / १० / २०२२ रोजी पत्रावर कोणतीच कारवाई केली नाही. इकडे गटशिक्षणाधिकाऱ्याचे धाडस वाढले. त्याने चक्क संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकेकडे निरोप पाठवला. ‘त्या’ बाईंना घेऊन ५ किंवा ६ नोव्हेंबरला बंगल्यावर दिवाळी फराळासाठी बोलावले. विशेष म्हणजे त्यावेळी घरात कोणी नसल्याचे आवर्जून सांगितले.
गटशिक्षणाधिकाऱ्यांचे हे धाडस पाहून संबंधित शिक्षिकेने स्वतःची व जि.प.ची अब्रू वाचवण्यासाठी काका साठेंना निनावी पत्र लिहिले आणि या प्रकरणाचा स्फोट झाला.
□ मुख्यमंत्री किंवा पालकमंत्र्यांच्या गाडीखाली आत्मदहन
या निनावी पत्रात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यावर १५ नोव्हेंबरपर्यंत कारवाई करावी, अन्यथा १९ नोव्हेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री यांच्या गाडीखाली आत्मदहन करणार असल्याचा इशारा संबंधित महिलेने काका साठेंना १ नोव्हेंबर रोजी पाठवलेल्या निनावी पत्रात दिला आहे. शिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी काहीच कारवाई करत नसल्याची तक्रारही याच पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकार प्रशासनाला माहिती असल्याचे उघड झाले आहे.
□ हे काय चाललंय शिक्षण विभागात ?
काका साठे यांनी ते निनावी पत्रच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर टाकले आणि विचारले, हे काय चाललंय शिक्षण विभागात तुमच्या ?” त्यावर बोलायला त्यांच्याकडे उत्तर नव्हते. मात्र या घटनेनंतर माध्यमांनी जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारले; तेव्हा याबाबत तात्काळ चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगून ते मोकळे झाले. अँटिकरप्शनच्या जाळ्यात नुकतेच सापडलेले शिक्षणाधिकारी लोहार आणि त्यानंतर गटशिक्षणा धिकाऱ्याचा प्रताप याचीच दिवसभर चर्चा ऐकायला मिळाली.