सोलापूर : वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि जिल्हा प्रमुख मनिष काळजे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटातील शेकडो पदाधिकाऱ्यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. The office-bearers of Solapur NCP joined the Shinde group in the presence of the Chief Minister
बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर स्व.आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, शिवाजी सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोलापूर राष्ट्रवादी शहराच्या पदाधिका-यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
यात राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सायबण्णा तेग्गेली यांच्यासह ठाकरे गट अक्कलकोट तालुकाप्रमुख संजय देशमुख, अक्कलकोट शहर प्रमुख योगेश पवार, उपतालुका प्रमुख सूर्यकांत कडबगावकर, सैपन पटेल, महिला आघाडी वैशाली हवनूर, कुंभारताई, युवा सेना शहरप्रमुख मदने विनोद यांच्यासह 22 पदाधिकारी तसेच राष्ट्रवादीचे अक्कलकोट तालुका कार्याध्यक्ष जाधव यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व शेकडो तालुका पदाधिकारी यांनी जाहीर प्रवेश केल्याचे मनीष काळजे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांचे कार्य पाहून काँग्रेस – राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी यापुढेही बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करतील, असेही मनीष काळजी यांनी बोलताना सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ सोलापूर । उपचारासाठी पैसे न मिळाल्याची खंत, परिवहन कर्मचाऱ्याचा करुण अंत
सोलापूर : सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाकडील निवृत्त कर्मचारी निवृत्तीनंतरची रक्कम दवाखान्यासाठी मिळावी म्हणून पाठपुरावा करण्यासाठी महापालिकेत आले असता कौन्सिल हॉलच्या पायऱ्या चढत असताना धाप लागली. तातडीने त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमातील निवृत्त कर्मचारी विलास पांडुरंग शिरसट (वय 65 वर्षे , रा. न्यू बुधवार पेठ, सोलापूर.) यांचे उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात बुधवारी (ता.9) सायंकाळी निधन झाले. यासंदर्भात अधिक माहिती अशी की सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाकडे विलास पांडुरंग शिरसाट हे अनेक वर्ष सेवा करून सुमारे चार वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतरची साधारणतः सहा लाख रुपयांची रक्कम महापालिका परिवहन उपक्रम देणे होते. त्यातील 25 ते 40 हजार रुपये रक्कम प्रशासनाने अदा केली होती.
दरम्यान विलास शिरसाट यांना हृदय विकाराचा त्रास होत होता. या हृदयावरील मेजर उपचारासाठी दोन लाख रुपये खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते. या उपचारासाठी ते पैसे मिळावेत याकरिता ते पालिकेत पाठपुरावा करीत होते. दरम्यान, बुधवारी दुपारी निवृत्त कर्मचारी विलास शिरसट हे महापालिका आवारात आयुक्तांना भेटण्यासाठी आले होते. येथील कौन्सिल हॉलच्या पायऱ्या चढत असतानाच त्यांना धाप लागली. चक्कर आल्याने ते खालीच बसले. यामुळे तातडीने सहकाऱ्यांनी त्यांना यापूर्वी उपचार घेत असलेल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. येथे व्हेंटिलेटर लावून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सायंकाळी उपचारादरम्यान त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली, अशी माहिती कामगार नेते अशोक जानराव यांनी दिली.
दरम्यान, कामगार नेते अशोक जानराव यांनी संबंधित निवृत्त कर्मचारी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांना प्रत्यक्ष भेटून माहिती दिली. अडचण सांगितली. महापालिका आयुक्तांनी तातडीने परिवहन उपक्रमातील अधिकारी पडगानूर यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या आदेश दिले. रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच परिवहन उपक्रमाकडील अधिकारी पडगानूर यांनी कामगार नेते अशोक जानराव यांच्या समवेत रुग्णालयात जाऊन त्यांची माहिती घेतली. उपचारासाठी खर्च देण्याची तजवीज केली. अंत्यसंस्कारासाठी दहा हजार रुपये मदत करण्यात आली.
महापालिका परिवहन उपक्रमाकडील निवृत्त कर्मचाऱ्यांना यापूर्वी थोडी रक्कम दिली होती. पोलीस प्रवासी अनुदानाची रक्कम प्राप्त झाल्यानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांना रक्कम अदा करण्याचे नियोजन आहे. आज संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यांसंदर्भात माहिती मिळताच आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
निवृत्त कर्मचाऱ्यांना देय रकमा वेळेत देणे गरजेचे आहे. वेळेत या रकमां न मिळाल्याने या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या औषध उपचाराचीही अडचण निर्माण होत आहे. आयुष्यभर सेवा करूनही हेलपाटे मारून निवृत्तीनंतरच्या रकमा मिळत नाहीत. अखेर निवृत्त कर्मचाऱ्यांना मरण पत्करावे लागले. कायदा व नियमापेक्षा माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून महापालिका प्रशासनाने निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या रकमा अदा कराव्यात, अशी मागणी कामगार नेते अशोक जानराव यांनी केली आहे.