》निवृत्तीच्या रक्कमेसाठी पालिकेत आले; धाप लागून पायऱ्यावरच कोसळले
सोलापूर : सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाकडील निवृत्त कर्मचारी निवृत्तीनंतरची रक्कम दवाखान्यासाठी मिळावी म्हणून पाठपुरावा करण्यासाठी महापालिकेत आले असता कौन्सिल हॉलच्या पायऱ्या चढत असताना धाप लागली. तातडीने त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. Solapur. Regret of not getting money for treatment, transport employee’s compassion End Dhap Municipality
सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमातील निवृत्त कर्मचारी विलास पांडुरंग शिरसट (वय 65 वर्षे , रा. न्यू बुधवार पेठ, सोलापूर.) यांचे उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात बुधवारी (ता.9) सायंकाळी निधन झाले. यासंदर्भात अधिक माहिती अशी की सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाकडे विलास पांडुरंग शिरसाट हे अनेक वर्ष सेवा करून सुमारे चार वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतरची साधारणतः सहा लाख रुपयांची रक्कम महापालिका परिवहन उपक्रम देणे होते. त्यातील 25 ते 40 हजार रुपये रक्कम प्रशासनाने अदा केली होती.
दरम्यान विलास शिरसाट यांना हृदय विकाराचा त्रास होत होता. या हृदयावरील मेजर उपचारासाठी दोन लाख रुपये खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते. या उपचारासाठी ते पैसे मिळावेत याकरिता ते पालिकेत पाठपुरावा करीत होते. दरम्यान, बुधवारी दुपारी निवृत्त कर्मचारी विलास शिरसट हे महापालिका आवारात आयुक्तांना भेटण्यासाठी आले होते. येथील कौन्सिल हॉलच्या पायऱ्या चढत असतानाच त्यांना धाप लागली. चक्कर आल्याने ते खालीच बसले. यामुळे तातडीने सहकाऱ्यांनी त्यांना यापूर्वी उपचार घेत असलेल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. येथे व्हेंटिलेटर लावून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सायंकाळी उपचारादरम्यान त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली, अशी माहिती कामगार नेते अशोक जानराव यांनी दिली.
दरम्यान, कामगार नेते अशोक जानराव यांनी संबंधित निवृत्त कर्मचारी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांना प्रत्यक्ष भेटून माहिती दिली. अडचण सांगितली. महापालिका आयुक्तांनी तातडीने परिवहन उपक्रमातील अधिकारी पडगानूर यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या आदेश दिले. रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच परिवहन उपक्रमाकडील अधिकारी पडगानूर यांनी कामगार नेते अशोक जानराव यांच्या समवेत रुग्णालयात जाऊन त्यांची माहिती घेतली. उपचारासाठी खर्च देण्याची तजवीज केली. अंत्यसंस्कारासाठी दहा हजार रुपये मदत करण्यात आली.
महापालिका परिवहन उपक्रमाकडील निवृत्त कर्मचाऱ्यांना यापूर्वी थोडी रक्कम दिली होती. पोलीस प्रवासी अनुदानाची रक्कम प्राप्त झाल्यानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांना रक्कम अदा करण्याचे नियोजन आहे. आज संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यांसंदर्भात माहिती मिळताच आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
निवृत्त कर्मचाऱ्यांना देय रकमा वेळेत देणे गरजेचे आहे. वेळेत या रकमां न मिळाल्याने या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या औषध उपचाराचीही अडचण निर्माण होत आहे. आयुष्यभर सेवा करूनही हेलपाटे मारून निवृत्तीनंतरच्या रकमा मिळत नाहीत. अखेर निवृत्त कर्मचाऱ्यांना मरण पत्करावे लागले. कायदा व नियमापेक्षा माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून महापालिका प्रशासनाने निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या रकमा अदा कराव्यात, अशी मागणी कामगार नेते अशोक जानराव यांनी केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● सोलापूर । 189 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
सोलापूर : राज्यातील 7750 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 189 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यात पहिली मोठी निवडणूक असणार आहे. माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला आहे.
या निवडणूक कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्ह्यातील 189 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्याने आचारसंहिता आजपासून लागू झाली असल्याचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी सांगितले.
ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये अक्कलकोट तालुक्यातील 20, बार्शी 22, करमाळा 30, माढा 8, माळशिरस 35, मंगळवेढा 18, मोहोळ 10, उत्तर सोलापूर 12, पंढरपूर 11, सांगोला 6 आणि दक्षिण सोलापूर 17 अशा एकूण 189 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक – दि. 18 नोव्हेंबर 2022 (शुक्रवार), नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ – दि. 28 नोव्हेंबर 2022 (सोमवार) ते दि. 2 डिसेंबर 2022 (शुक्रवार) सकाळी 11 ते दुपारी 3. नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ – दि. 5 डिसेंबर 2022 (सोमवार) सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ – दि. 7 डिसेंबर 2022 (बुधवार) दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ – दि. 7 डिसेंबर 2022 (बुधवार) दुपारी 3 वाजल्यानंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक – दि. 18 डिसेंबर 2022 (रविवार) सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत (मात्र नक्षलग्रस्त भागामध्ये उदा. गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांकरिता सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत).
मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) – दि. 20 डिसेंबर 2022 (मंगळवार). जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक – दि. 23 डिसेंबर 2022 (शुक्रवार) पर्यंत.