सोलापूर/ मोहोळ : सोलापूर जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी भीमा सहकारी साखर कारखाना निवडणूक मतमोजणी आज झाली. यात पाटील – परिचारक गटाचा सुपडा साफ झाला असून खासदार धनंजय महाडीक यांच्या विजयाची हॅट्ट्रिक झालीय. Bhima Factory Election: Patil – Attendant’s Group Cleared; Mahadika’s hat-trick of victory
संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि मोहोळ मंगळवेढा आणि पंढरपूर या तीन तालुक्याची आर्थिक नाडी असणाऱ्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवत सर्वच्या सर्व म्हणजे १५ जागावर मतदारांनी विद्यमान चेअरमन आणि भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्यावर विश्वास दाखवत प्रचंड मतांनी सलग तिसऱ्यांदा कारखान्याच्या चाव्या त्यांच्या हातात दिले आहे.
दरम्यान या निकालामुळे मोहोळ पंढरपूर व मंगळवेढा यातील तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. साखर कारखान्याची निवडणूक म्हणजे सभासदाबरोबर सर्व शेतकऱ्यांच्या आणि त्या संबंधित छोटे – मोठे उद्योगाच्या अर्थकारणाची निगडित असते. कारखान्यात येणारा ऊस आणि त्याचं योग्य वजन आणि मिळणारा समाधानकारक दर याची खात्री देणारा आणि आगामी पाच वर्ष कारखाना नीट चालू शकेल अशा व्यक्तीच्या हातात सत्ता देणे आवश्यक असते, असा विचार मतदाराच्या मनात असतो आणि गेल्या वर्षभरात खासदार मुन्ना महाडिक यांनी या दृष्टीने टाकलेली पावले ही त्यांना विजयाकडे घेऊन गेल्याचे दिसून येत आहे.
राज्यात शेतकरी संघटना दरासाठी आक्रमक आंदोलन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी उसाचा दर निवडणुकीपूर्वीच २६०० रुपये जाहीर करून टाकला आणि उचल देण्याची घोषणा केली. त्यामुळे विरोधकांची चांगलीच कोंडी झाली.
धनंजय महाडीक यांच्यासोबत प्रचारात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, विश्वराज महाडीक, मानाजी माने, रमेश बारसकर, भाजपाचे नेते माजी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे, तालुका अध्यक्ष सुनिल चव्हाण, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, भैया देशमुख, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चवरे, विद्यमान उपाध्यक्ष सतीश जगताप, तालुका प्रमुख प्रशांत भोसले, सरचिटणीस महेश सोवनी आणि रमेश माने, भाजपचे प्रज्ञावंत आघाडीचे जिल्हा संयोजक अविनाश पांढरे, शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर, काँग्रेसचे शाहीर हावळे, भिमराव वसेकर, सुरेश शिवपुजे आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● राजन पाटील का हरले ?
राजन पाटील यांनी स्वतःचा साखर कारखाना निवडणुका टाळण्यासाठी मल्टीस्टेट केला, भीमावर लोकनेतेची निर्मितीची उभारणी केली, हा विरोधकांनी केलेला प्रचार कारणीभूत ठरला. प्रशांत परिचारक यांचा एक खाजगी व एक सहकारी साखर कारखाना आहे, असे असताना राजन पाटील, प्रशांत परिचारक यांनी एकत्र येवून निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णयच सभासदांना रुचला नाही.
राजन पाटील व त्याची दोन मुले असा एकांगी प्रचार होता. इतर दिग्गज नेते नव्हते. कामगारामधील असंतोष व कर्ज याशिवाय मुद्दाच नव्हता. महाडीक यांच्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे देवू शकले नाहीत. दर आणि वजनकाटा याबाबत मौन पाळले. त्यामुळे माजी आमदार पाटील व परिचारक यांच्या भीमा बचाव पॅनलला सभासदांनी अक्षरश: झिडकारले आहे.
□ महाडीक का विजयी झाले ?
भिमा सहकारी कारखान्याच्या निवडणूकी पूर्वी महाडीक यांनी २६०० रु दर जाहीर केला आणि २२०० रुपये उचल देण्याची घोषणा, इथेनॉल प्रकल्प वर्षभरातच सुरु करण्याच दिलेले आश्वासन , विश्वराज महाडीक यांनी वाढवलेला जनसंपर्क व शेतकरी सभासदाना दाखलेली आपुलकी, विरोधक भाव जाहीर करण्यात असमर्थ ठरले. विरोधकांच्या प्रचारात ठोस मुद्दे नव्हते. राजन पाटील यांनी टाकळी येथील सभेत केलेले वक्तव्य याचाही सभासद मतदारावर परिणाम झाला. त्यामुळे त्याही गोष्टीचा महाडिक यांना विजयासाठी चांगलाच फायदा झाला.
□ पहिल्या दोन फेरीतच विजयाची खात्री
भिमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकांची मतमोजणी आज सकाळी सोलापूरात श्री सिध्देश्वर मंगल कार्यालयात सुरु झाली आहे. आज दुपारी १ वाजता मिळालेल्या प्राथमिक कलानुसार महाडीक यांच्या भिमा शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार काही मतदारसंघात ३५०० मतांनी आघाडीवर आहेत.
खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे उमेश पाटील, प्रशांत परिचारक,अभिजित पाटील हे निवडणूक मैदानात आहेत. या निवडणूकसाठी 15 संचालकांसाठी 35 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. रविवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. भीमा सहकारी कारखान्यातील 78.86 टक्के सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
पहिल्या फेरीत मतदान बूथ क्रमांक १ ते २८ वरील मतांचे गठ्ठे एकत्र करुन मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीमध्ये सभासदांचा कल पुन्हा एकदा विद्यमान चेअरमन तथा भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भीमा शेतकरी विकास आघाडीच्या बाजूने साधारण कल असल्याची माहिती आहे. यामध्ये पहिल्या फेरीत अंदाजे ३५०० मतांचे लीड असल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिकृत घोषणा लवकरच निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे करणार आहेत.
या निवडणूकीत एकूण १९४३० पैकी १५३२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणूकांची मतमोजणी सोलापूरात होटगी रस्त्यावर सिध्देश्वर मंगल कार्यालयात सकाळी सुरु झाली. मतमोजणीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. प्रथम मतांच वर्गीकरण करण्यात आलं. पहिल्या फेरीत अंबेचिंचोली पुळूज, फुलचिंचोली, शंकरगांव, विटे, उचेठाण, ब्रम्हपुरी, औंढी, टाकळी सिकंदर, पेनूर, पाटकूळ, वरकुटे, तांबोळे, तारापूर, मगरवाडी, या भागातील मतमोजणी सुरु झाली आहे.
दुपारी १ च्या सुमारास पहिल्या टप्प्यातील मतमोजणी पूर्ण झाली असून यामध्ये खासदार धनंजय महाडीक यांच्या भिमा परिवार पॅनलचे उमेदवार जवळपास ३५०० मतांनी आघाडीवर आहेत. सायंकाळी ५ वाजता निकालाचं चित्र नक्की कोणाच्या बाजूनं हे स्पष्ट होणार आहे. अद्याप दोन्ही गट आम्हीच विजय होणार, असा दावा करत आहेत.
● या नेत्यांची लागली होती प्रतिष्ठा पणाला
भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकित भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे धनंजय महाडिक, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे उमेश पाटील, भाजप सहयोगी माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील,भाजप आमदार समाधान अवताडे, विठ्ठलचे कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके, माजी उपसभापती तानाजी माने, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस रमेश बारसकर, चंद्रभागा साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे,जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.