पंढरपूर – श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरात यापूर्वी रूंदीकरण झाले असून आता राज्य शासनाने जाहीर केलेला पंढरपूर कॉरिडॉर चंद्रभागेच्या वाळवंटात किंवा ६५ एकरात करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिक व व्यापारी यांनी केली आहे. यासाठी मंदिर परिसर बचाव संघर्ष समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला. Pandharpur. Formation of Temple Premises Rescue Sangharsh Committee; Demand for Pandharpur Corridor 65 acres or desert
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी आल्यावर पंढरपूर कॉरिडॉरची घोषणा केली होती. याबाबत प्रशासनाकडून वेगाने काम सुरू आहे. या अंतर्गत मंदिराच्या चारही बाजूस दोनशे व त्याहून अधिक फूट रूंदीकरण सुचविण्यात आले आहे. तसेच मंदिराकडे येणार्या बारा गल्ली बोळात देखील रूंदीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
यामुळे येथील नागरिक व व्यापार्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. सदर प्रस्तावित रूंदीकरणास विरोध करण्यासाठी तसेच कॉरिडॉर बाबत निर्णय घेण्यासाठी रेणुका देवी मठात बैठक आयोजित करण्यात आली होती. यास चारशेहून अधिक उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी उपस्थित नागरिकांनी पंढरपूर कॉरिडॉरचे स्वागत केले. परंतु यापूर्वी मंदिर परिसरात रूंदीकरण करण्यात आले आहे. यामध्ये अनेकांची संपूर्ण घरे बाधित झाली तर अनेकांची अर्धेअधिक घरे पाडण्यात आली होती. यामुळे पुन्हा या परिसरात रूंदीकरणास कडाडून विरोध करण्यात आला. यासह मंदिरा लगत अनेक लहान बोळ असून येथे देखील अनावश्यक व तुलनेने अधिक रूंदीकरण सुचविण्यात आले असल्याचे मत उपस्थितांनी नोंदवले. या रूंदीकरणासदेखील विरोध दर्शविण्यात आला.
दरम्यान पंढरपूर कॉरिडॉरसाठी चौफळा ते महाव्दार चौक हा रस्ता निवडण्याऐवजी चंद्रभागेचे वाळवंट किंवा ६५ एकर परिसर निवडल्यास मोठ्या जागेत कॉरिडॉर होऊ शकतो. अशी सूचना उपस्थितांनी मांडली. तसेच महाव्दार घाटावरून चंद्रभागेच्या पैलतिरावर ८० फूट रुंदीचा भव्य पूल बांधून यावर देखील कॉरिडॉर उभारल्यास कोणीही विस्थापित न होता सुशोभिकरण व विकास होणार असल्याची सूचना मांडण्यात आली.
दरम्यान सदर सूचना न स्वीकारल्यास लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन, उपोषण, मोर्चा काढून विरोध दर्शविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासर्व प्रक्रियेसाठी मंदिर परिसर बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात येणार आहे. बैठकीस वारकरी पाईक संघाचे रामकृष्ण महाराज वीर, माजी नगराध्यक्ष हरिष ताठे, पांडुरंग घंटी, पंढरपूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष रा.पां.कटेकर, माजी नगरसेवक आदित्य फतेपुरकर, शैलेश बडवे, ऋषिकेश उत्पात, नाना कवठेकर, नरेंद्र डांगे, राजगोपाल भट्टड, कौस्तुभ गुंडेवार, नारायण गंजेवार, श्रीकांत हरिदास, राहुल परचंडे, डॉ.प्राजक्ता बेणारे, बाबा महाजन, ऍड.ओंकार जोशी आदी उपस्थित होते.