□ पाहिला निवडणुकीचा स्वार्थ साधला स्वप्नपूर्तीचा परमार्थ
• सोलापूर : लक्ष्मी-विष्णू चाळीतील कामगारांना त्यांचे हक्काचे घरकुल मिळवून देऊन त्यांची स्वप्नपूर्ती करण्याच्या प्रस्तावास महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी कोलदांडा दाखवल्यामुळे कोल्हेंचे स्वगृहातील ग्रह फिरले. त्यातून वैतागलेल्या कोल्हे यांनी एकीकडे आगामी पालिका निवडणुकीचा स्वार्थ आणि दुसरीकडे गृहनिर्माणाची स्वप्नपूर्ती करण्याचा परमार्थ, अशी सांगड घालून राष्ट्रवादीचे नेते दिलीपभाऊ कोल्हे यांनी बुधवारी शिवसेनेच्या शिंदेगटात गृहप्रवेश केला. Swagriha planets have moved, Dilip Bhau Kolhe went to Shindegriha for housing Solapur Politics Chal
दिलीप कोल्हे हे राष्ट्रवादीमधील वादग्रस्त नेते. त्यांच्या सौभाग्यवती माजी नगरसेविका. स्वतः कोल्हे यांनी उपमहापौर पदाच्या रूपातून पालिकेतील सत्तेची फळे चाखलेली. पराभव झाल्यानंतरही मागच्या दाराने पालिकेत प्रवेश करून राष्ट्रवादीमध्ये त्यांनी आपला धबधबा कायम ठेवला. पक्षात राहून पक्षसंघटनेबाबत परखड बोलणारे नेते म्हणून भाऊंची ओळख.
त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचे कधीच पटले नाही. थेट ‘गॉडफादर’ शरद पवार, अजित पवार यांच्याशी घरोबा असल्याने पक्षाचे स्थानिक पदाधिकारीसुध्दा त्यांना दबकून असत. राष्ट्रवादीने भरभरून दिले असतानाही कोल्हे यांनी मनगटावरचे घड्याळ का काढले? याचा शोध घेतला असता अनेक पैलू शिंदे गटाच्या प्रवेशामागे असल्याचे दिसून आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
१) लक्ष्मी-विष्णू ही मिल कामगारांची शंभर वर्षांची चाळ आता जीर्ण झाल्यामुळे रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे. मिल बंद पडल्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा तसेच या घरकुलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिलीप कोल्हे यांच्या सौभाग्यवती मंगला कोल्हे या नगरसेवक असताना त्यांनी सुभद्राबाई नागरी सहकारी गृहनिर्माण सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीच्या माध्यमातून या गोरगरीब कष्टकरी गिरणी कामगारांना हक्काचे घरकुल देण्याचा स्वप्न दाखवले.
२) स्वप्नपूर्तीसाठी गृहनिर्माण सोसायटीचा शुभारंभ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि तत्कालीन पालकमंत्री पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते केला. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असतानाही आणि महाविकास आघाडीचे सरकार असतानाही हा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार यांना साकडे घातले. मात्र पक्षातील नेतेमंडळींनी प्रत्येकवेळी कोलदांडा घातला.
३) ही जागा बी २ (म्हणजे कमर्शिअल झोन) आहे. या जागेवर गृहनिर्माण वसाहत उभी करायची असल्यास ही जागा बी १ (रहिवासी झोन) करावी लागते. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव सादर केल्यावर राज्यशासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर त्या जागेवर घर साकारण्याचे स्वप्न पूर्ण होते. सत्ता असताना राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींची मंत्रालयातील दालने आणि घराचे उंबरठे पालथे घातले. तरीही स्वप्नपूर्ती झाली नाही.
४) महाआघाडीचे सरकार असताना सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या माध्यमातून गृहनिर्माण साकारण्याचा प्रयत्न केला. मात्र वळसे-पाटील यांनी हा प्रस्ताव शहराध्यक्षांच्या माध्यमातून पक्षाकडे सादर करा, अशा सूचना केल्या. येथून वादाची पहिली ठिणगी पडली आणि कोल्हे यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीला चव्हाट्यावर आणण्यास सुरुवात केली.
५) राज्यातील महाआघाडीचे सरकार पडले. शिंदे-फडणवीस सरकार आले. शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यात रांगा लागल्या. कोल्हे यांच्याही अनेक वर्षापासून रखडलेला गृहनिर्माणचा प्रश्न सुटण्याच्या अशा पल्लवीत झाल्या. तसा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने शिंदे गटाचा झेंडा त्यांनी हाती घेतला.
६) महाविकास आघाडीचे सरकार असताना पालिकेच्या निवडणुकीसाठी सातजणांची समिती गठीत करण्यात आली होती. त्यात कोल्हे यांचा समावेश होता. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी समितीच्या सदस्यांमध्ये वाढ करत निर्णय प्रक्रियेपासून कोल्हे यांना डावलण्यास सुरुवात केल्याने त्यांची नाराजी वाढली अन् राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला.