□ नव्या आयुक्तपदी शितल तेली – उगले यांची नियुक्ती
सोलापूर : कोरोनाच्या काळात आपल्याकडे आयुक्त पदाचा कारभार आला. या काळात जेवढे शक्य होते तेवढे चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. याला कर्मचाऱ्यांसह आरोग्य विभागाने ही चांगली साथ दिली तसेच सोलापूरकरांचेही चांगले सहकार्य लाभले, असे पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. The satisfaction of having done this work, while their regret; Commissioner P. Sentiments expressed by Shivshankar
आज गुरुवारी (ता.17) सायंकाळी पालिका आयुक्त शिवशंकर यांच्या बदलीचे आदेश आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की सोलापूरकर हे समजून घेणारे आहेत. आपण घेतलेले प्रत्येक निर्णय त्यांनी कोणताही विरोध न करता स्वीकार केले आहेत. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपण अनेक योजना राबवल्या कामांमध्ये सुधारणा केल्या त्यालाही कर्मचाऱ्यांनी चांगली साथ दिली. कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी कारवाई करणे आवश्यक होती ती आपण केली. केवळ कामात शिस्तपणा आणण्यासाठी आपण कारवाई केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आपल्या कार्यकाळात कंबर तलावाचे सुशोभीकरण झाले, सिद्धेश्वर मंदिरातील लेसर शो सुरू झाला. तसेच 24 कोटींचे रस्ते पूर्ण होत आहेत याचे समाधान आहे. एबीडी एरियामध्येही रोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले होते. त्यालाही यश मिळाले आहे. बीओटी प्रोजेक्ट पूर्ण करू शकलो नाही, याशिवाय कर्मचाऱ्यांची भरती ऑर्डर आली नसल्यामुळे होऊ शकली नाही, याची खंत वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. काम करताना राजकीय दबाव आला असला तरी प्रत्येक कामे नियमानुसारच केली आहे. सोलापूर शहरातील लोकप्रतिनिधींनी ही आपल्याला अडीच वर्षाच्या काळात सहकार्य केल्याचेही आयुक्तांनी यावेळी आवर्जून सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ आपण लावलेली शिस्त पुढे टिकावी
आपण आपल्या कार्यकाळात पालिकेला आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. यात यशही आले आहे. ही शिस्त पुढे टिकावी ही अपेक्षा असल्याचे यावेळी पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी बोलून दाखवले
महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांची अखेर नागपूर येथे वस्त्रोद्योग संचालक या पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी श्रीमती शितल तेली-उगले (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी तसे आदेश काढले आहेत. त्यानंतर सोलापूर महापालिकेचे बहुचर्चित आयुक्त पी शिवशंकर यांची अखेर बदली झाली आहे. नागपूर येथे वस्त्रोद्योगचे संचालक या पदावर श्रीमती शितल तेली-उगले (भाप्रसे) यांच्या जागी ते पद कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करून केली आहे.
सध्याच्या पदाचा कार्यभार नगर विकास विभागाचे प्रधान सचिव (२) यांच्या सल्ल्याने अन्य अधिका-याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा , असे आदेशात म्हटले आहे.नागपूर येथे वस्त्रोद्योगचे संचालक श्रीमती शितल तेली-उगले (भाप्रसे) यांची सोलापूरचे महापालिका नवे आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापूर शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापूरचा चेहरा मोहरा बदलला होता, शिवाय अन्य विकास कामे प्राधान्याने करून नागरिकांची मने जिंकली होती.
पालिकेत फटाके उडवताना कामगार संघटनेचे अशोक जानराव आणि पोलिसांमध्ये वादावादीचा प्रसंग निर्माण झाला. पालिका आयुक्तांची बदली झाल्यानंतर महापालिका कामगार संघटना कृती समितीचे अशोक जानराव यांनी पालिकेच्या आवारात फटाके आणले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटकाव केला. एक कामगार संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये थोडवेळ वादावादीचा प्रसंग निर्माण झाला. वादावादी नंतर संबंधित पोलिसांनी आणखी पोलिसांची जादा कुमक पालिका आवारात मागून घेतली.
आयुक्त पी शिवशंकर यांचे मिळकत कर रिविजन, सार्वजनिक नळ तोड मोहीम, कर्मचाऱ्यांवर कारवाई यासह काही निर्णय वादग्रस्त ठरले होते. दरम्यान काही महिन्यापूर्वी महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आयुक्त पी शिवशंकर यांच्या बदलीसाठी मोर्चाही काढला होता. अनेक वेळा पी शिवशंकर यांची बदली झाल्याची अफवा उठत होती. अखेर आज गुरुवारी शासनाने त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.