□ गार्डला बदडले, शुटिंगचे मोबाईलही फोडले
□ झिंगलेल्या अवस्थेत आले, मारहाण करुन गेले
• पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मातब्बर, तगडे व नेहमीच वादग्रस्त ठरलेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूरला आल्यानंतर विश्रामगृहातील रुम देण्याच्या कारणावरून तिथल्या गार्डला बेदम मारहाण केली. शनिवारी (ता. 19) रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. झिंगलेल्या अवस्थेत मारहाण करून मोबाइल फोडले, गार्डला बदडले. MLA Santosh Bangar’s disciples were beaten up by a mob in Pandharpur and their mobile phones were broken
या मारहाणीत सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावणारे सौरभ कदम यांना मुका मार लागला आहे. मारहाणीचे चित्रीकरण करताना या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत त्यांचा मोबाईलही फोडून टाकला. आमदार नसताना त्यांचे चेले कशी झुंडशाही करतात ? सोबत आमदार असतील तर त्यांचा ‘प्रताप’ काय असू शकेल ? असा संतापजनक प्रश्न पंढरपूकरांमधून उपस्थित केला जात आहे.
झाले असे की- शिंदे सरकारमधील एक मंत्री डॉ. सुरेश खाडे हे दर्शनासाठी रविवारी पंढरपूरला आले होते. त्यासाठी शनिवारीच विश्रामगृहातील खोल्या बुक झाल्या होत्या. कदम हे नेहमी प्रमाणे आपली सेवा बजावत असताना एका कारमधून पाचजण विश्रामगृहावर आले. त्यांनी कदमांकडे रुम देण्याची मागणी केली. कदम यांनी बुकिंग केले आहे का? अशी विचारणा केली. बुकिंग केल्याशिवाय रुम दिली जात नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या कार्यकर्त्यांनी कदम यांना दमबाजी सुरु केली.
आम्ही आमदार संतोष बांगर यांचे कार्यकर्ते आहोत, असे म्हणत रुम उघडून देण्यासाठी दबाव आणू लागले. दरम्यान त्यातील एकाने आमदार बांगर यांना फोन लावून रुम देत नसल्याची तक्रार केली. सारेजण चिडून कदम यांना मारहाण करायला सुरूवात केली. कदम यांनी मारहाणीचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये केल्यानंतर हे कार्यकर्ते अजून भडकले. शुटिंग करतोय काय म्हणत कदम यांना परत मारहाण करून शिवीगाळही केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● आमदारही भडकले…
मारहाण करून हे कार्यकर्ते थांबले नाहीत तर आ. बांगर यांच्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यानंतर खुद्द बांगर यांनी मोबाईलवरुन त्या सुरक्षा रक्षकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन रुम उघडून देण्यासाठी दमबाजी केली. आमदारांनी दमबाजी करुन देखील रुम देत नसल्याने कार्यकर्त्यांनी त्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. मारहाण करणारे झिंगलेल्या अवस्थेत होते, असे हा प्रकार पाहिलेल्यांनी सांगितले.
आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी कदम यांना बेदम मारहाण करुन पळ काढला. सदरची घटना रात्री उशिरा घडल्याने कदम यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली नाही मात्र घडलेली घटना पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्या कानावर घातली. पोलीस कारवाई बाबत गावडे हे वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे समजते.
● चक्क पोलिसालाच शिवीगाळ
‘मातोश्री’ चे निष्ठावंत असणारे संतोष बांगर हे सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटात दाखल झाले. त्यानंतर त्यांची एक एक वागणूक गेल्या दोन महिन्यात वादग्रस्त ठरत आहे. मंत्रालयात कार्यकर्त्यांना अडवल्याबद्दल बांगर यांनी चक्क पोलिसालाच शिवीगाळ केली. तू मला काय शिकवतो का ? अशी भाषा त्यांनी वापरली. हा प्रकार ४ नोव्हेंबरला घडला. त्यानंतर पोलीस दलाने बांगर यांच्याविषयीचा एक अहवाल सरकारकडे पाठवला आहे. बांगर यांनी ज्या पोलिसाला शिवीगाळ केली, तो माजी सैनिक असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बांगर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. असे असताना अजूनही त्यांच्याकडून व त्यांच्या चेल्यांकडून झुंडशाहीचे प्रकार सुरू व्हावेत, ही राज्याची शोकांतिकाच म्हणावी लागेल.