● थर्ड पीआयला अँटीकरप्शनवाल्यांनी लावला थर्ड,
● पो.नि.च्या नावाने लाच; दोघांना ठोकल्या बेड्या
• सोलापूर : एकेकाळी शहरातील विजापूर नाका आणि सदर बझार पोलीस ठाण्यात थर्ड पी.आय. म्हणून वावरणाऱ्या एका एजंटाला सोमवारी सोलापूर अँटीकरप्शनच्या पथकाने थर्ड लावला. थर्ड पीआय म्हणून वावरणा-या या लाचखोराने विधान सभा निवडणूक लढवली होती. ‘Yuvraj’, who contested the assembly, asked for bribe in the name of police inspector, both arrested 3rdPI Bijapur Naka Sadar Bazar
पोलीस निरीक्षक आमच्या ओळखीचे आहेत, त्यांच्यामार्फत तुम्हाला मदत करतो, त्यासाठी ‘तुम्हाला दीड लाख रुपयांची लाच मागणाऱ्या या थर्ड पी.आय.सह त्याच्या एका साथीदाराला अटक करून बेड्या ठोकल्या. न्यायालयाने या दोघांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. युवराज भीमराव राठोड ( वय ३७, रा. समर्थ नगर, जुळे सोलापूर) व साजन रमेश हावळे ( वय – ३६, रा. ए विंग ७०५, मंगल रेसिडेन्सी, जुळे सोलापूर) अशी अँटीकरप्शनच्या पथकाने अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
युवराज राठोड याने दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. त्याचा राष्ट्रवादी पक्षात वावर होता. अनेक जाहिरातीत त्याचे फोटोही झळकले. पण निवडणुकीत त्याने अचानक वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली. ॲड. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावामुळे त्यास निवडणुकीत अपेक्षेपेक्षा चांगली मते पडली. तेव्हापासून युवराज सर्वासमोर आला. पण नंतर तो राजकीय पक्षापासून दूर राहिला. निवडणुकीत समोर आल्यापासून त्याने थर्ड पीआय म्हणून वावर वाढला.
त्याचे झाले असे की अँटीकरप्शनकडे येथील विजापूर नाका पोलीस ठाण्यातील अँटीकरप्शनकडे तक्रार करणाऱ्याविरुध्द तक्रारी अर्ज चौकशीकामी आला आहे. त्या अर्जाची सध्या चौकशी पोलीस ठाणे स्तरावर चालू आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चांगल्या परिचयाचे आहेत, त्यांच्यामार्फतीने अर्ज चौकशीमध्ये सहकार्य करण्यासाठी आणि चौकशीअंती गुन्हा दाखल न करण्यासाठी युवराज राठोड आणि त्याचा सहकारी साजन हावळे यांनी तक्रारदाराकडे तब्बल दीड लाखांची मागणी केली.
दरम्यान तक्रारदाराने अँटीकरप्शनकडे तक्रार केली. पडताळणीमध्ये या दोघांनी दीड लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून अँटीकरप्शनच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दोघांनाही अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● गुन्हे शाखेतही कामकाज
शहर गुन्हे शाखेत यापूर्वी असलेल्या अधिकाऱ्यांसोबतही राठोड याने अशाच प्रकारे सूत जुळवून उद्योग केला होता. त्याकाळात डान्सबारचालकांसोबत मध्यस्थी करण्याची मोठी कामगिरी याच थर्ड पी.आय.ने बजावली होती. त्यासाठी फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पाठीमागील सरकारी बंगल्यात अनेकवेळा झालेल्या बैठकांनाही थर्ड पी.आय. उपस्थित राहत होता, अशीही नवीन चर्चा पोलिसांमध्येच या घटनेनंतर सुरू झाली आहे.
■ काय आहे तक्रारी अर्जात ?
शहरातील एका व्यक्तीने फायनान्सद्वारे चारचाकी विकत घेतली होती. काही महिन्यांपूर्वी त्याचे निधन झाले. त्यानंतर ती चारचाकी गाडी त्याची मैत्रीण असलेल्या महिला पोलीस ( शहराबाहेर नेमणूक) कर्मचाऱ्याने नेली. ही बाब फायनान्सवाल्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे चारचाकी किंवा चारचाकीच्या हप्त्यांसाठी तगादा लावला.
मात्र त्या पोलीस कर्मचारी महिलेने हप्ते भरण्यास नकार देऊन ती चारचाकी गायब केली. त्यानंतर फायनान्सवाल्यांनी त्या महिला पोलिसाविरूध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला. त्याची चौकशी आयटीआय चौकीतील सहाय्यक निरीक्षकांकडे देण्यात आली होती. या प्रकरणात सहकार्य करण्यासाठी राठोड आणि हावळे यांनी त्या महिलेलेकडे दीड लाखांची मागणी केली आणि त्यातच ते फसले.
■ सदर बझार व विजापूर नाक्यात थर्ड पी. आय. सारखा वावर
एकेकाळी सदर बझार पोलीस ठाण्यात राठोड याचा मुक्त वावर होता. राठोड हा तिथे थर्ड पी. आय. सारखा वावरत होता. त्यानंतर तेथील वरिष्ठ निरीक्षकांची विजापूर नाका पोलीस ठाण्यात बदली झाली. त्यांच्यासोबत विजापूर नाका पोलीस ठाण्यातही राठोड थर्ड पी.आय. सारखाच वावरत होता. तेथून त्या पोलीस निरीक्षकाची बदली झाल्यानंतर नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षकासोबतही राठोड याने सूत जुळवले होते, अशी पोलिसांमध्येच चर्चा सुरू झाली आहे.
■ पुन्हा सदर बझार
विजापूर नाका पोलीस ठाण्यातील त्याही पोलीस निरीक्षकांची बदली झाल्यानंतर राठोडने पुन्हा सदर बझार पोलीस ठाण्याकडे मोर्चा वळवला. ‘बजरंग बली की जय’ म्हणत पुन्हा थर्ड पी. आय. ची भूमिका सुरू केली. तिथेही कोणी तक्रार घेऊन आले की त्यांना गाठून त्यांच्याशी चर्चा करणे, पी.आय. ओळखीचे आहेत, तुम्हाला सहकार्य करतो, असे सांगून उकळाउकळीचे उद्योग सुरू केले होते, अशी चर्चा या घटनेनंतर आयुक्तालयातून ऐकायला मिळत आहे.
■ हावळेंनी लावला अनेकांना चुना
निम्म्या किंमतीत दुचाकी / चारचाकी मिळवून देतो अशी थाप मारून साजन हावळे याने सोलापुरातील अनेकांकडून पैसे गोळा केले. काहींना गाड्या दिल्या. काहींना गाड्यांची कागदपत्रेच दिली नाहीत. काहींना तर गाड्याही दिल्या नाहीत आणि घेतलेले पैसेही परत केले नाहीत. या प्रकरणातही हावळेविरूध्द शहरात गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वी चोरीचा गुन्हाही हावळेवर दाखल झाला आहे. त्यात त्याने नुकताच जामीन मिळवला आहे.