□ महापालिकेच्या वतीने गोवर लसीकरण व सर्वेक्षणाचे काम युद्ध पातळीवर !
सोलापूर : सोलापूर शहरात गोवर आजाराचे दोन संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, गोवर आजाराच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आरोग्य विभागाची कार्यशाळा घेण्यात आली. सोलापूर महापालिकेच्या वतीने गोवर लसीकरण व सर्वेक्षणाचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. Two suspected measles patients found in Solapur; Vaccination – speed up the survey work Health Department
राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये गोवर साथ फैलावत आहे. सोलापुरात त्याचा प्रादुर्भाव नाही. या गोवर आजाराचे सोलापूर शहरात नई जिंदगी परिसरातील दोन संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एका रुग्णास डिस्चार्जही देण्यात आला आहे. शहरातील एकाच भागात जर पाच रुग्ण आढळून आले तर या आजाराचा “आऊट ब्रेक” झाला असे मानण्यात येते परंतु सोलापूर शहरात अद्याप तशी कोणतीही परिस्थिती नाही. केवळ दोन संशयित रुग्ण आढळले आहेत. महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.
गोवर आजाराच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेची आरोग्य यंत्रणा अधिक दक्ष आणि सतर्क झाले आहे. सोमवारी (ता. 28) दुपारी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बसवराज लोहारे यांनी शहरातील 15 नागरिक आरोग्य केंद्र तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी यांची कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेमध्ये आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना गोवर आजारासंदर्भात सर्वेक्षण व लसीकरण मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. येत्या 10 दिवसात 9 महिने ते पाच वर्षे वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण व लसीकरणाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, या संदर्भात आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी पत्रकारांना अधिक माहिती दिली. ते म्हणाले, महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार सोलापूर महापालिका आरोग्य विभागाअंतर्गत गोवर हजाराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत आहे. सोलापूर शहरातील 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील मुलांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून गोवर रूबेला लस घेतलेले आणि लस न घेतलेल्या मुलांची यादी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या दहा दिवसात घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण त्याचबरोबर लसीकरणाचे कामही युद्ध पातळीवर करण्यात येत असल्याचे डॉ. बसवराज लोहारे यांनी सांगितले.
सोलापूर महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये 0 ते 2 वर्ष वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात एम.आर. वॅक्सिंनचा पहिला डोस न घेतलेले 2 हजार 029 मुले आढळली होती. त्यापैकी त्यानंतर 1 हजार 916 मुलांना एमआर वॅक्सिंनचा डोस देण्यात आला. उर्वरित मुलांनाही आता डोस देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे तसेच एमआर वॅक्सिंनचा दुसरा डोस न घेतलेले 1 हजार 809 मुले आढळलेली होती. त्यापैकी 1हजार 709 मुलांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
त्यानंतर आता गोवर साथीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण येत्या दहा दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. या संदर्भात आरोग्य विभागातील संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. या वयोगटातील ज्या मुलांना एमआर वॅक्सिंन लस दिली नाही, त्यांची माहिती घेऊन त्यांना लस देण्याची मोहीम सुरू केली आहे. शहरातील महापालिकेच्या 15 नागरी आरोग्य केंद्रामध्ये ही लस मोफत उपलब्ध करण्यात आली आहे, असेही महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. आरोग्य बसवराज लोहारे यांनी सांगितले.
गोवर हा आजार लसीकरणाने टाळता येतो, तेव्हा प्रत्येक पालकांनी आपल्या पाच वर्षाच्या आतील मुलांना गोवर रूबेला लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. सोलापूर महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रात ही लस मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. ज्या मुलांना लसीकरण झाले नसेल त्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी केले आहे.
गोवर हा संसर्गजन्य आजार आहे. लसीकरणामुळे हा आजार टाळता येतो. त्यामुळे तातडीने आवश्यक ते उपचार घेणे आवश्यक आहे. गोवर आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने नजीकच्या नागरी आरोग्य केंद्रात तसेच डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी केले आहे. गोवर आजाराच्या रुग्णांसाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात ऍडमिटची सोय करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
□ ही आहेत गोवरची लक्षणे
गोवर आजाराची सर्दी, खोकला, दम लागणे, अंगावर लालसर पुरळ येणे, अंग लाल होणे अशी लक्षणे आहेत. तशी लक्षणे दिसून आल्यास नजीकच्या नागरी आरोग्य केंद्र तसेच डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. गोवर रूबेला लसीकरणामुळे हा आजार टाळू शकतो.
चार ते पाच दिवसात रुग्ण बरा होऊ शकतो. तीव्र असेल तर अधिक उपचार घेण्याची गरज असते. ही लस सुरक्षित असून कोणताही साईड इफेक्ट होत नाही. तेव्हा नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना लसीकरण करून घ्यावे तसेच घरी आलेल्या सर्वेक्षकास गोवर लसीकरण संदर्भात माहिती द्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी केले आहे.