□ विमानसेवेचा वाद पाडापाडीवरून पोहचला तोडातोडीवर
सोलापूर : सोलापूर विमानसेवा आणि सिद्धेश्वरची चिमणी यावरून संघर्ष वाढला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘चिमणी हटाव’ विरुध्द ‘चिमणी बचाव’ असा संघर्ष (चक्री उपोषण) आता सुरू झाला आहे. आता विमानसेवेचा वाद पाडापाडीवरून तोडातोडीवर विषय पोहचला आहे. Clash in Solapur: Chimney Removal vs Chimney Rescue Siddheshwar Sugar Factory Airport
सोलापूरच्या विकासासाठी होटगीरोड विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू झालीच पाहिजे, यासाठी सिध्देश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा दूर केलाच पाहिजे, या मागणीसाठी एकीकडे सोलापुरातील व्यापारी एकवटले असून त्यासाठी त्यांनी ‘चिमणी हटाव’ आंदोलन उभारले आहे.
दुसरीकडे चिमणी चिमणी पडली तर कारखाना बंद पडतो, कारखाना बंद पडला तर कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांची चूल बंद पडेल, म्हणून कारखाना वाचलाच पाहिजे यासाठी ‘चिमणी बचाव’ आंदोलन उभे राहत आहे. आता शेतकरी आक्रमक झाले असून पाडापाडीला तोडातोडीच्या भाषेत उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विमानसेवेचा वाद आता पाडापाडीवरून तोडातोडीवर पोहचला आहे.
होटगीरोड विमानतळावरून नियमित विमानसेवा चालू झालीच पाहिजे, ही आग्रही मागणी करत सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून आंदोलन उभारले आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांचे चक्री उपोषण सुरू झाले आहे. त्यातच कारखाना बंद करण्याची नोटीस हरित लवादाने दिल्यामुळे या आंदोलनाला ताकद मिळाली आहे. सध्या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. ऐन हंगामातच कारखाना बंद पडला तर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या ऊस गाळपाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यामुळे कारखाना वाचलाच पाहिजे; या मुद्यावर शेतकरी एकवटले असून त्यांनीही चक्री उपोषण सुरू केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● आंदोलन विरुध्द आंदोलन
विमानसेवेच्या मागणीसाठी सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात पूनम गेटवर व्यापाऱ्यांचे चक्री उपोषण सुरू आहे. दुसरीकडे मंगळवारपासून शेतकरी आणि सभासदांनी उत्तर पंचायत समितीकडील प्रवेशद्वारावर चक्री उपोषण सुरू केले आहे. कारखान्याची चिमणी पाडून होटगीरोड विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली पाहिजे, ही विकास मंचची मागणी आहे. चिमणी न पाडता बोरामणी विमानतळाचे काम तात्काळ सुरू करावे, अशी सभासद शेतकऱ्यांची मागणी आहे.
● शेतकरी कोयता घेऊन मागे लागतील
राज्यातील सहकार क्षेत्रासाठी आदर्श असलेल्या श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडून विमानसेवा सुरू करण्याची मागणी न्यायाची आहे का? कारखान्याच्या चिमणीला धक्का लावाल तर सोलापूर शहर बंद करू, विमानसेवेसाठी शेतकऱ्यांचे जीवन उद्धस्त करू पाहणाऱ्या मंडळींच्यामागे हातात कोयते घेऊन लागू तेव्हा त्यांना शेतकऱ्यांची खरी ताकद कळेल.
– शिवशरण पाटील (माजी आमदार)
● त्यांचा बंदोबस्त करू
सोलापूरला विमानसेवा सुरू व्हावी ही आमचीही मागणी आहे. लाखो लोकांची उपजीविका असलेला सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना बंद पाडण्याचा कोणी प्रयत्न करत असतील तर ते आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. कारखान्याच्या विरुध्द पडद्यामागे राहून कारस्थान करणाऱ्यांनी पुढे यावे. त्यांचा आम्ही बंदोबस्त करू. कोणत्याही परिस्थितीत सिध्देश्वर कारखान्याला धक्का लागू देणार नाही.
– सिद्रामप्पा पाटील (माजी आमदार)
● बोरामणी विमानतळासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांसाठी कामधेनू असून त्यावर सुमारे दीड लाखांपेक्षा अधिक लोकांची उपजीविका अवलंबून आहे. विमानसेवेत कारखान्याची चिमणी अडथळा असल्याची सातत्याने मागणी लावून धरणाऱ्यांनी हा हेका सोडून बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सामूहिकपणे प्रयत्न करायला हवा.
– प्रा. डॉ. रावसाहेब पाटील (अध्यक्ष : अ. भा. मराठी जैन साहित्य संमेलन )