● 2.13 कोटी रुपये मिळकत कर थकबाकी वसूल
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या विशेष वसुली पथकाकडून थकीत मिळकतकर वसुलीपोटी नेहरूनगर येथील बीपीएड कॉलेजच्या कार्यालयास सील ठोकण्यात आले.बुधवारी दिवसभरात विशेष पथक आणि दैनंदिन वसुली असे एकूण महापालिकेच्या तिजोरीत 2 कोटी 13 लाख 6 हजार 86 रुपये भरणा झाला आहे. Solapur. Office seal of BPEd College, special recovery team action of Municipal Corporation
सोलापूर महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकीदारांविरोधात बेधडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ , सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विशेष पथकाकडून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
गेल्या आठ दिवसापासून जप्ती व सील कारवाई करण्यात येत आहे. आज बुधवारी विशेष वसुली पथकाने 5 लाख 37 हजार 254 रुपयाच्या थकबाकीपोटी नेहरूनगर येथील बीपीएड कॉलेज कार्यालयास सील ठोकले. विशेष वसुली पथकाकडून होत असलेली सील कारवाई टाळण्यासाठी 3 थकबाकीदारांनी एकूण 9 लाख 24 हजार 453 रुपये थकबाकी भरणा केली आहे. यामध्ये गंगाधर तेलगी – 1 लाख 753 रुपये, सतीश बंडे – 7 लाख 11 हजार 967 रुपये, अमेरिकन मिशन – 1 लाख 11 हजार 733 रुपये मिळकत कर थकबाकी भरली आहे, अशी माहिती महापालिका कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांनी दिली.
विशेष वसुली पथकामार्फत आज दिवसभरात एकूण तीन थकबाकीदारांकडून 9 लाख 24 हजार 453 रुपये वसुली केली आहे तर दैनंदिनसह दिवसभरात एकूण दोन कोटी 3 लाख 81 हजार 633 रुपये वसुली झाली आहे. असे दोन्ही मिळून एकूण 2 कोटी 13 लाख 6 हजार 86 रुपये मिळकतकर थकबाकी वसुली झाली आहे.
● अभय योजनेचा होता शेवटचा दिवस
महापालिकेच्या वतीने मिळकत कर शास्तीमध्ये 80 टक्के सवलत अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेचा आज 15 डिसेंबर रोजी शेवटचा दिवस होता. त्यानंतर मात्र छोट्या व मोठ्या मिळकत कर थकबाकीदारांविरोधात सरसकट कारवाई करण्यात येणार आहे. तेव्हा मिळकत कर थकबाकीदारांनी कटू कारवाई टाळण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांनी केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ बायोमेडिकल वेस्ट कचरा टाकणाऱ्या सोलापुरातील हॉस्पिटलवर दंडात्मक कारवाई
सोलापूर : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरातील सात रस्ता परिसरात असलेल्या होमगार्ड मैदानाजवळील इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटलवर ५ हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी नुकतेच सूचित केले आहे. तर दुसरीकडे बायो मेडिकल वेस्ट कचरा टाकणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात येत आहे. शहरातील सात रस्ता परिसरात असलेल्या होमगार्ड मैदानाजवळील इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटलवर ५ हजार रुपयांच्या दंडाची कारवाई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आली आहे.
येथील इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटलकडून बायो मेडिकल वेस्ट कचरा टाकल्याप्रकरणी कारवाई करून ५ हजाराचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, यापूर्वी सोलापूर शहरातील अनेक रुग्णालयांवर रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्ट साहित्यकचरा रस्त्यावर, उकिरड्यावर आणि इतरत्र टाकून दिल्या प्रकरणी कारवाई करून दंड वसूल करण्यात आला होता. शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देऊन आरोग्य निरीक्षकांमार्फत सर्वत्र तपासणी आणि कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर कचरा टाकल्यास तसेच बायो वेस्टही इतरत्र टाकण्यात आल्यास महापालिका प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.