□ शहरवासीयांमधून संतप्त सवाल !
सोलापूर : सोलापूर शहराच्या सुमारे 13 लाख लोकांची जीवनदायिनी समजल्या जाणार्या उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिन्याचे काम थांबवण्यात आले आहे. तरीही सोलापूर शहरातील खासदार, आमदार, माजी नगरसेवक व नेते या विषयावर गप्प का आहेत, असा संतप्त सवाल शहरवासीयांमधून उपस्थित होत आहे. त्यामुळे सोलापूरला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. Solapur Municipal Corporation asked why the people’s representatives and leaders are silent even after the work of the double aqueduct has been stopped
सोलापूरला 20-22 वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सुरूवात झाली. त्यात वाढ होत गेली आता शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यात दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देत निवडणुका लढवल्या. मात्र प्रत्येक वेळी सोलापूरकरांची घोर निराशा झाली. त्यासाठी म्हणावा तेवढा प्रयत्न त्या त्या काळातील सत्ताधार्यांकडून झाला नाही.
2017 मध्ये महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर 650 कोटींच्या उजनी- सोलापूर दुहेरी जलवाहिनीला मंजुरी देण्यात आली. अनेक अडचणीचा मार्ग काढत दुहेरी जलवाहिनीचा मक्ता पोचमपाड कंपनीला देण्यात आला. या ना त्या कारणाने या कंपनीने काम पूर्ण करण्यास विलंब केला. त्यातच कोरोना महामारी लॉकडाऊनचे निमित्तही झाले. महापालिका प्रशासनान पोचमपाड कंपनीला विलंब झाला म्हणून दंड आकारला , टर्मिनेटही केले. त्यानंतर मक्ताही रद्द करण्यात आला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
त्यानंतर महाविकास आघाडीने नव्याने दुहेरी जलवाहिनीचे टेंडर काढत या कामाचा मक्ता कोल्हापूरच्या लक्ष्मी कंपनीला देण्यात आला. ही टेंडर प्रक्रियाही प्रलंबित राहून उलट सुलट चर्चेला वाव मिळाला. त्यानंतर अखेर लक्ष्मी या कंपनीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर कंपनीला वर्कऑर्डर ही देण्यात आली. दरम्यानच्या काळात सोलापूर स्मार्ट सिटी कार्पोरेशनचे तत्कालिन सीईओ ढेंगळे-पाटील यांनी वर्क ऑर्डर दिल्यानंतर काही दिवसातच हे काम सुरू झाल्याचे स्पष्ट केले होते.
या दुहेरी जलवाहिनीच्या पाईपलाईनची साईड बदलून ती दुसर्या बाजूने करण्याचा निर्णय झाला आणि त्याचं सर्वेक्षणही सुरू झाल्याची माहिती ढेंगळे-पाटील यांनी दिली होती. मात्र काही दिवसातच नाट्यमय घडामोडीनंतर ढेंगळे पाटील यांना कार्यमुक्त करण्यात आले. अशातच नुकतीच स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन ची बैठक पार पडली. त्यानंतर महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी दुसर्या दिवशीच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात उजनी जलवाहिनीचे तत्कालिन सीईओ ढेंगळे-पाटील यांच्या आदेशानुसार 24 नोव्हेंबर रोजीच काम थांबवण्यात आल्याचे स्पष्ट केले.
दुहेरी जलवाहिनीचे काम थांबवल्याची बातमी सर्वत्र वार्यासारखी पसरली असे असतानाही सोलापूर शहरातील खासदार, आमदार, माजी नगरसेवक व तसेच विविध कारणांनी आंदोलन करणारे नेते हे गप्प का आहेत, असा सवाल सोलापूरकरांमधून उपस्थित होत आहे.
अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून या जलवाहिनीचे काम आता कुठे मार्गी लागेल असं वाटत असतानाच हे काम का थांबवण्यात आले, यासंदर्भात अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित होत आहेत. सोलापूरचे कारभारी मानल्या जाणार्या लोकप्रतिनिधींनी या संदर्भात आवाज उठवावा आणि हे दुहेरी जलवाहिनीच काम मार्गी लावावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
□ लोकप्रतिनिधी अधिवेशन आवाज उठवणार का ?
सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. सोलापुरातील आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख आणि आ. प्रणिती शिंदे हे तिघे अधिवेशनात सोलापूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न उपस्थित करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.