अकलूज : लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच विवाहितेचा गळा दाबुन खुन झाल्याची घटना घडली आहे.माळशिरस तालुक्यातील नेवरे गावात खुनाची घटना घडली. पोलिसांनी मयत विवाहितेच्या सासरकडील लोकांना अटक केली आहे. Malshiras | Marriage took place before four months, married woman strangulated to death Solapur
याबाबत अधिक माहिती अशी, करमाळा येथील कोमल सुभाष यादव हिचा चार महिन्यापूर्वी नेवरे (ता. माळशिरस) येथील गणेश पांडुरंग गायकवाड याच्याशी थाटामाटात दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी विवाह नेवरे येथे झाला होता. लग्नानंतर कोमल गणेश गायकवाड या नवविवाहितेला सासू मनीषा व सासरा पांडुरंग गायकवाड व नवरा गणेश तिघे मिळून मानसिक त्रास देत होते. लवकर उठण्यापासून ते चुलीवरचा स्वयंपाक येत नाही तसेच माहेरी फोन करु न देणे अशा प्रकारचा मानसिक त्रास देत होते.
त्याचप्रमाणे तुझ्यापेक्षा मला सुंदर मुलगी मिळाली असती. अजूनही मला चांगले चांगले स्थळ येत आहेत, असे म्हणत नवरा गणेश मानसिक व शारीरिक त्रास देत होता. पंधरा हजार रुपये माहेरहून आणून दे, म्हणून दि. १८ डिसेंबर २०२२ रोजी कोमलला सासू सासरा व नवरा गणेश यांनी बेदम मारहाण करून तिच्या बरगड्या तोडून नरडे दाबून तिचा खून केला. खून उघडकीला येऊ नये म्हणून तिने फास घेतला असा फाशी घेतल्याचा बनाव केला अशा आशयाची फिर्याद कोमलची आई राणी सुभाष यादव यांनी अकलुज पोलीसात दिली. याचा तपास स.पो.नी,एस.डी कांबळे या करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● माहेरच्या लोकांना अनपेक्षित धक्का
– कोमलच्या माहेरकडील यादव कुटुंबाला आपली मुलगी सिरीयस आहे न्यायला या, असे म्हणून फोन केला. यावेळी यादव कुटुंबातले सदस्य अकलूज येथे गेले असता मुलगी कोमल मरण पावली. तिचे अकलूज उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन सुरू असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी कुटुंबीयांना अनपेक्षित धक्का बसुन क्षणात वातावरण बदलले. अत्यंत गरिबीतून कोमल यादव हिने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. नेवरे भागातील चांगला बागायतदार शेतकरी नवरा मिळाला म्हणून संपूर्ण यादव कुटुंब आनंदी होते. तो आनंद अल्पकाळच टिकला. अवघ्या चार महिन्यातच कोमलचा दुर्देवी अंत यादव कुटुंबाला पहावा लागला.
या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात नवरा गणेश पांडुरंग गायकवाड, सासू मनीषा पांडुरंग गायकवाड, सासरा पांडुरंग रामचंद्र गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. खून करणे व मानसिक त्रास देणे व पुरावा नष्ट करणे असा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी या तीन आरोपींना तात्काळ अटक केली.
□ आरोपींना फाशी देण्याची आईची मागणी
– लग्नानंतर केवळ चार महिन्यात मुलगी कोमल हिला शारीरीक व मानसिक त्रास देत तिचा निर्घृण खून करणाऱ्या सासू-सासरा व नवरा यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मयत विवाहितेची आई राणी सुभाष यादव यांनी केली आहे. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर माहेरकडील संतप्त लोकांनी मृतदेह ताब्यात घेवुन करमाळा येथे अंतसंस्कार केले.