सोलापूर : एलआयसी विमा पॉलिसीची रक्कम परस्पर स्वतःच्या नावे करून घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एलआयसी एजंटासह तीन जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Fraud: Criminal case registered against three including LIC agent in Solapur
ही घटना दि.१८ ऑगस्ट २०२१ पासून ते आजतागायत पर्यंत घडली. याप्रकरणी आफरीन जावेद शेख (वय-२१,रा. मुक्काम महात्मा गांधीनगर,जि. लातूर) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सासु हसीना फैजअहमद शेख, सासरे फैजअहमद बशीरअली शेख व एलआयसी एजंट आर.एस कराळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी यांचे पती जावेद फैजअहमद शेख हे हयातीत असताना त्यांनी त्यांच्या नावे जीवन विमा महामंडळ सोलापूर येथे पॉलिसी उतरवून विमावर नॉमिनी म्हणून फिर्यादी आफरीन व फिर्यादी यांची सासू हसीना यांना ५०-५० टक्के हक्कदार केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या पतीचे मृत्यू झाला व त्यांच्या नावे मिळणारी विमा पॉलिसी रक्कम २३ लाख ४२ हजार रुपये रक्कमेपैकी फिर्यादी यांच्या हिश्याचे विमा पॉलिसीची रक्कम ११ लाख ७२ हजार रुपये ही फिर्यादी आफरीन यांना मिळू नये म्हणून वरील संशयित आरोपी यांनी संगणमत करून मृत्यू दाव्या संदर्भात एलआयसी ऑफिस येथे फिर्यादी यांच्या नावे खोटा अर्ज सादर केला.
बनावट सह्या करून विम्याची रक्कम २३ लाख ४२ हजार रुपये ही हसीना शेख यांनी परस्पर स्वतःच्या नावे घेऊन फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. मिळालेली विम्याची रक्कम फिर्यादी यांच्या हिश्याची विमा पॉलिसीची रक्कम ११ लाख ७२ हजार रुपये फिर्यादीस न देता त्या रक्कमेपैकी ११ लाख ४७ हजार ९३३ रुपये ही फिर्यादी यांची मुलगी सबिरा शेख हिच्या नावे पॉलिसी काढून काही माहिती न देता परस्पर रक्कम उतरवली. उतरवलेल्या पॉलिसीवर होल्डर म्हणून फिर्यादी यांचे सासरे फैजअहमद शेख यांनी त्यांचे स्वतःचे नाव लावले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास पोसई डोंगरे हे करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ अज्ञात चोरट्याने पळविले दोन मोबाईल
सोलापूर : अज्ञात चोरट्याने दोन महागडे कंपनीचे मोबाईल चोरून नेल्याची घटना दि.१९ जानेवारी रोजी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड येथील शेड हॉल क्रमांक एक समोर घडली.
याप्रकरणी सोमनाथ गुंडु पवार (वय-२२,रा. मु.पो. मराठवाडी, ता.अक्कलकोट, सोलापूर) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचा वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल व तसेच विठ्ठल सुतार यांचा आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने बुलेरो पिकअप गाडीच्या समोरील बाजूस ठेवलेला असताना चोरून नेला आहे. असे फिर्यादीत नमूद आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख हे करीत आहेत.
□ चोरट्याने पळविली दुचाकी
सोलापूर : अज्ञात चोरट्याने दुचाकी क्रमांक एम.एच.१३.डीए.७७८३ ही हाजी हजरत खान मस्जिद मुरारजी पेठ येथे पार्क करून ठेवलेली असताना चोरून नेली आहे. ही घटना दि.१८ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी इम्रान म.अय्युब सय्यद (वय-३५,रा.शिवगंगा नगर भाग -१, मजरेवाडी ) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करित आहे.