□ 20 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचा हायकोर्टाचा आदेश
सोलापूर – शहरातील एका सामूहिक दुष्कर्म प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी करुन त्याचा अहवाल 20 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एस. गडकरी व पी.डी.नाईक यांनी दिले. Solapur | Superintendent of Police to investigate gang rape, High Court orders report
गणेश कैलास नरळे (वय 29), विष्णू गुलाब बरगंडे (वय 40, दोघे रा. आवसे वस्ती, आमराई) यांनी पीडित महिलेवर सामूहिक दुष्कर्म केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दाखल केली होती. परंतु तपास अधिकार्याने आरोपी बरगंडे याच्याविरुध्द पुरावा मिळाला नसल्याचे नमूद केले तर आरोपी नरळे याच्याविरुध्द किरकोळ फसवणुकीच्या गुन्ह्याअतंर्गत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
पीडितीने तपास अधिकार्याच्या तपासावर व्यथित होवून उच्च न्यायालयात या प्रकरणात तपास अधिकारी बदलून अन्य अधिकार्याकडे तपास हस्तांतर करावा व प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास करावा याकरिता याचिका दाखल केली होती. त्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती गडकरी व नाईक यांच्या खंडपीठासमोर झाली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने तपास अधिकारी विष्णू गायकवाड यांच्यावर गंभीर ताशेरे ओढले.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ आय.पी.एस. अधिकार्यास हस्तांतरित करण्याचा आदेश पोलीस महासंचालकांना दिला होता. त्यानुसार पोलीस महासंचालकांनी उच्च न्यायालयात म्हणणे सादर केल्यानंतर उच्च न्यायालयाने या सामूहिक दुष्कर्म प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी करुन 20 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. यात पीडितेतर्फे अॅड. विक्रांत फताटे व अॅड. प्रशांत नवगिरे हे काम पाहात आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》अनैतिक संबंधातून मित्राचा दगडाने ठेचून खून; आरोपीला जन्मठेप
□ ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा
सोलापूर – विधवा बहिणी सोबत अनैतिक संबंध असल्याचा कारणावरून आपल्या मित्राचा बियरची बाटली आणि दगडाने ठेचून खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यात 75 हजार रूपयांचा दंड सुनावला. हा दंड मयताच्या पत्नी आणि मुलास नुकसान भरपाई देण्याचा आदेश झाला आहे.
विशाल उर्फ सायबा सुरवसे (वय २३ रा.आदर्श नगर,शेळगी) असे आरोपीचे नाव आहे. याला जन्मठेप आणि ७५ हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा सत्रन्यायाधीश आर. एन.पांढरे यांनी आज शुक्रवारी ठोठावली. दंडाच्या वसूल रकमेतून ५० हजार रुपये मयताची पत्नी आणि २५ हजार रुपये मयताच्या लहान मुलास नुकसान भरपाई देण्याचेही आदेशात नमूद आहे. नितीन नागनाथ उबाळे (वय ३२ रा. भीमनगर,शेळगी) असे मयताचे नाव आहे.२६ मार्च २०२१ रोजी रात्रीच्या सुमारास त्यांचा शेळगी येथील महालक्ष्मी सोसायटीच्या पाठीमागे नागोबा मंदिरा समोरच्या मैदानात खून झाला होता.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, या घटनेतील मयत नितीन उबाळे हे विवाहित असून ते महापालिकेत कंत्राटी काम करीत होते. तर आरोपी विशाल सुरवसे हा त्यांच्या लांबचा नातेवाईक असून तो देखील शेळगी परिसरात राहण्यास होता. आरोपीच्या विधवा बहिणी सोबत नितीन उबाळे याचे अनैतिक संबंध होते. त्यामुळे विशाल हा नितीन याच्यावर चिडून होता. या कारणावरून पूर्वी त्यांच्यात तक्रार देखील झाली होती.
घटनेच्या दिवशी म्हणजेच २६ मार्च २०२१ रोजी महापालिकेत काम न लागल्याने नितीन उबाळे हे कांद्याच्या पिशव्या घेऊन मार्केट यार्ड येथे विकण्यास गेले होते. रात्री घरी न आल्याने त्यांचे भाऊ महेश यांनी फोन लावला त्यावेळी नितीन याने आपण मार्केट यार्ड असून घराकडे येतो असे सांगितले होते. मात्र ते रात्री आलेच नाही.
२७ मार्च रोजी सकाळच्या सुमारास नितीन उबाळे यांचा मृतदेह शेळगी परिसरातील नागोबा मंदिरासमोरील मैदानात खून केलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाजवळ मयताची दुचाकी आढळली होती. या घटनेची फिर्याद मयताचे बंधू परशुराम उबाळे (रा.भीमनगर, शेळगी) यांनी जोडभावी पेठ पोलिसात दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी विशाल सुरवसे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली. तत्कालीन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्ष दर्शनी पुरावा नव्हता.घटनेच्या दिवशी आरोपी आणि मयत या दोघांनी फ्रुट बिअरच्या बाटल्या विकत घेतल्या होत्या. दारू पिऊन हॉटेलमध्ये जेवण करताना तसेच दुचाकी वरून दोघे जाताना कांही लोकांनी पाहिले होते. त्या साक्षीदारांची साक्ष, मयत आणि आरोपी यांच्या कपड्यावरील रक्ताचे डाग, परिस्थितीजन्य पुरावा, फिर्यादीची साक्ष आणि सरकार पक्षाने मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
तसेच मयताची पत्नी पूजा उबाळे यांना ५० हजार रुपये तर मुलगा आनंद उबाळे (वय ५ वर्षे) याला २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश आरोपीला दिला. या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत तर आरोपीच्या वतीने ॲड गणेश पवार आणि ॲड शेंडगे यांनी काम पाहिले.