नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी चुकीचे एबी फॉर्म पाठवले असल्याचे म्हटले आहे. तांबेंनी चुकीचे एबी फॉर्म पत्रकार परिषदेत दाखवले आहेत. ‘आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी एक स्क्रिप्ट रचण्यात आली, असा माझा आरोप आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी प्रदेश काँग्रेस कार्यालयावर काय कारवाई करणार असा प्रश्न मी विचारतो’, असे तांबेंनी म्हटले आहे. Created a script to defame the family, worked to push it into BJP: Satyajit Tambe press conference
नाशिक पदवीधर मतदारसंघातील विजयानंतर आज आमदार सत्यजित तांबे पत्रकार परिषद घेऊन दुपारी आपली पुढची भूमिका जाहीर केली. जे बोललं जातंय ते अर्धसत्य आहे, पूर्ण सत्य मी सांगणार आहे असं वक्तव्य यापूर्वी सत्यजित तांबे यांनी केलं होतं. त्यामुळे सत्यजीत तांबे नेमकी काय भूमिका घेणार? सत्यजित तांबे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यांनी यापुढे अपक्ष म्हणूनच काम करणार असल्याचे सांगून चर्चांना विराम दिला आहे. अनेक संघटनांनी मला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे मी अपक्षच राहीन, देवेंद्रजी अजितदादा, पवार साहेब सगळ्यांची मदत मी मागितली, असेही सत्यजीत तांबे यांनी सांगितले.
नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती, पण त्यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. सुधीर तांबे यांच्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी उमदेवारी अर्ज भरला, पण काँग्रेसचा एबी फॉर्म नसल्यामुळे सत्यजीत तांबे यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली. तांबे पिता पुत्रांनी केलेल्या या बंडामुळे काँग्रेसने त्यांचं सहा वर्षांसाठी निलंबन केले.
ज्या वेळी मी संधी मागायचो तेव्हा मला वडील आमदार असल्याने संधी देता येणार नाही, असे सांगत होते. माझ्या वडिलांनी हा मतदारसंघ बांधला. सर्वपक्षीय संबंध चांगले होते. मी आमच्या प्रभारी एचके पाटील यांना भेटलो. संघटनेत काम करण्याची संधी मागितली. मला एचके पाटील यांनी वडिलांच्या जागेवर उभे राहायला सांगितले, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. संताप झाला.’ ‘माझ्या पुस्तक प्रकाशनाला मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह अजितदादांनाही आमंत्रित केलं होतं. तेव्हा देवेंद्रजी बोलले त्यावरून चर्चा झाली.
सभागृहातदेखील दाद मिळाली. आमची भावना त्यांनी बोलून दाखवली. ते मला मोठ्या भावासारखे आहेत. त्या कार्यक्रमानंतर चर्चा सुरू झाली. एका बाजूला माझा पक्ष संघटना संधी देऊ शकत नाही तेव्हा वडिलांनी मला सांगितलं मी थांबतो तू लढ, पण वडिलांच्या जागेवर मला नको होतं. घरात आम्ही चर्चा केली तेव्हा थोरात साहेबदेखील होते. सत्यजीत निवडणूक लढेल हे ठरले होते,’ असा गौप्यस्फोट सत्यजीत तांबे यांनी केला.
‘पक्षाला आणि एचके पाटील साहेबांना आम्ही हे कळवलं. आम्ही त्यांच्या संपर्कात होतो, कारण हे तिकीट दिल्लीतून मिळतात, त्यांनी सांगितलं कोरा एबी फॉर्म पाठवला आहे. अर्ज भरण्याच्या दोन दिवस आधी 2 जानेवारीला एबी फॉर्म पक्षाकडे मागितला. त्यांनी नागपूरला बोलावलं, तिथे माझा माणूस गेला. 10 तास त्या माणसाला बसावं लागलं, तेव्हा त्याला नाना पटोले यांनी फॉर्म दिला. 11 तारखेला तो फॉर्म घेऊन पोहोचलो. बंद पाकीट फोडलं तेव्हा दोन्ही एबी फॉर्म पाठवले ते नाशिकचे नव्हते. एक औरंगाबाद आणि दुसरा नागपूर मतदारसंघाचा एबी फॉर्म आम्हाला दिला,’ असा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला आहे.
आमदार सत्यजीत दादा तांबे यांना नाशिक ऐवजी नागपूर आणि औरंगाबाद येथील कोरा एबी फॉर्म महाराष्ट्र काँग्रेसकडून देण्यात आला होता, त्यामुळे सत्यजीत तांबे यांनी निवडणूक अपक्ष लढवली व येणाऱ्या काळात देखील अपक्षच राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.#SatyajeetTambe pic.twitter.com/VieE8EFxIY
— Aman Tiwari (@amantiwari1616) February 4, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
‘काँग्रेस प्रदेश कार्यायलाने असा फॉर्म का दिला? हा माझा प्रश्न आहे. आजपर्यंत हे मान्य का केलं नाही? माझा भाजपकडून लढण्याचा डाव असता तर मी त्यांना चुकीचे फॉर्म आले असं सांगितलं नसतं. त्यानंतर त्यांनी पाठवलेला फॉर्म सुधीर तांबे यांच्या नावाने दिला. आमच्या परिवाराला बदनाम हे सगळं केलं गेलं. प्रदेश काँग्रेसने यावर उत्तर दिलं नाही. हे सगळं बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी करण्यात आलं,’ असा आरोपही सत्यजीत तांबे यांनी केला.
एचके पाटील यांनादेखील मी फोन केले, त्यांनी फोन घेतले नाही. नाना पटोले यांचा फोन बंद होता. मी नॅशनल काँग्रेसचे नाव फॉर्मवर टाकले होते, मात्र मी एबी फॉर्म न जोडल्याने तो फॉर्म अपक्षमध्ये कनव्हर्ट झाला. मला भाजपमध्ये ढकलण्याचं काम केलं गेलं. 12 तारखेला मला एचके पाटील यांचा फोन आला, त्यांना मी सगळी अडचण सांगितली. मला पाठिंबा जाहीर करा, असं मी त्यांना सांगितलं. मी महाविकासआघाडीच्या नेत्यांना भेटलो. मला पाठिंबा देण्यासाठी मी सगळ्यांना भेटलो. मला पाठिंह्यासाठी त्यांनी पत्र लिहायला लावलं. मला माफी मागायला लावली, मी माफीही मागितली,’ असं सत्यजीत तांबे यांनी सांगितले.
‘मी एचके पाटील यांना पत्र लिहिले आहे. मी संजय राऊत यांच्यासोबत देखील बोललो. माफी मागत असताना आम्हाला धोका दिला, फसवले असं नाना पटोले बोलत गेले. एकीकडे केंद्रीय नेतृत्व बोलत असताना राज्य नेतृत्व डाव आखत होते. ही माझी शेवटची पत्रकार परिषद असेल, आता मला काम करायचं आहे. भाजप नेतृत्वाला पाठिंबा मागितला नसतानाही त्यांनी मला मदत केली. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसे सह सगळे लोक माझ्या सोबत होते. राजकारण निवडणुकीपुरतं असतं. हातसे हात जोडो मोहीम सुरू आहे, मात्र पेर से पेर अडकवण्याचं काम सुरू आहे, ते थांबवायला हवं. आम्हाला बदनाम केलं.
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार सत्यजीत तांबे यांनी भाजपाला मोठा धक्का दिला आहे. अनेक दिवसांपासून ते भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र मी अपक्षच राहणार आहे आणि वेळोवेळी मी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची मदत घेणार आहे, असे तांबे यांनी म्हटले आहे. तर मला काँग्रेसमधून बाहेर काढण्याचे षडयंत्र सुरु आहे, मात्र मी काँग्रेस सोडली नाही, असेही ते म्हणाले.
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला. त्यानंतर प्रश्न पडला आहे की तांबे कोणत्या पक्षाचे ? अशातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले आहे. सत्यजित आमचे आहेत आणि आमच्या बरोबर राहतील, असे ते म्हणाले आहेत. तसेच तांबेंना सोबत घ्यावं अशी माझी इच्छा आहे. मी स्वतः हाय कमांडला तशी विनंती करणार, असेही ते म्हणाले.
सत्यजीत तांबे यांच्याबद्दल आमचे प्रवक्ते हे सविस्तर उत्तर देतील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. ‘दोन डोंगरावर हात ठेऊन कशा प्रकारे चालतात हे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, मला या हायव्होल्टेज ड्रामामध्ये पडायचे नाही, हा त्यांचा कौटुंबिक वाद आहे,’ असे नाना पटोले पुण्यात म्हणाले. दरम्यान, कसबा व चिंचवडसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार उद्या जाहीर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
》 शुभांगी पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश
नाशिक पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सहकाऱ्यांसोबत शिवबंधन बांधून त्यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. मी हारले नाही, तुम्ही हारु नका. मी आज शिवबंधन बांधले. मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसाठी लढत राहील, असे यावेळी माध्यमांशी बोलताना शुभांगी पाटील म्हणाल्या.