सोलापूर : अजित उंब्रजकर
शिंदे- फडणवीस सरकार येऊन ७ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. आता अधिवेशनापूर्वी फेब्रुवारी अखेरपर्यंत दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. यात ‘तम तम मंदी’तील तीन आमदारात कोण होणार नामदार ? याची चर्चा होत आहे. Three MLAs in ‘Tam Tam Mandi’; Who will be famous? Vinay Kore Vijay Deshmukh Sachin Kalyanshetty
पश्चिम महाराष्ट्रातून विनय कोरे ( कोल्हापूर), विजयकुमार देशमुख (सोलापूर शहर उत्तर), सचिन कल्याणशेट्टी (अक्कलकोट) हे तीन लिंगायत समाजाचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे या विस्तारात लिंगायत समाजाच्या कोणत्या नेत्याला मंत्रिपद मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिन्ही आमदारांनी आपापल्यापरीने मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात तम तम तीन आमदार आणि मंत्रिमंडळ विस्तारात कोण होणार नामदार अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत.
नुकतेच मुंबई येथील आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजाचा मोर्चा काढण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी विनय कोरे यांच्याकडे दिली होती तसेच आ. विजय देशमुख आणि आ. सचिन कल्याणशेट्टी यांनाही या मोर्चात सहभागी होण्यास सांगितले होते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात लिंगायत समाजाचा विचार निश्चितच फडणवीस यांच्याकडून होणार, असे मानले जात आहे. आता ते कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकणार याची उत्सुकता लागली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● विनय कोरे (कोल्हापूर)
पश्चिम महाराष्ट्रात लिंगायत समाजाचे तीन आमदारांमध्ये सोलापूरचे जावई तथा जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे हे कोल्हापूर जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करतात. ते कोल्हापुरातून आमदार असले तरी ते सोलापूरचे जावई आहेत. सोलापूर शहरात त्यांचे राजकीय वजन चांगले आहे.
२००७ साली त्यांच्या जनसुराज्य पक्षाचे ४ नगरसेवक हे भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शहर उत्तर मतदारसंघात निवडून आले होते. याचबरोबर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही विश्वासू मानले जातात. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत त्यांना भाजपला साथ दिली होती. दुसरीकडे कोल्हापुरात भाजपची ताकद कमी आहे. त्यामुळे खा. धनंजय महाडिकांच्या जोडीला आणि हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील यांच्या तोडीस तोड नेता असलेल्या विनय कोरे यांना मंत्रीपदाची संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.
● सचिन कल्याणशेट्टी (अक्कलकोट )
लिंगायत समाजातील दुसरे नाव आमदार म्हणजे सचिन कल्याणशेट्टी. सध्या आ. कल्याणशेट्टी देवेंद्र फडणवीस यांच्याबरेच जवळ गेले आहेत. माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा पराभव करत ते निवडून आले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकी त्यांनी फडणवीस यांच्यासोबत काम केले आहे.
या कामगिरीचे बक्षीस म्हणून त्यांना सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. जिल्ह्यातील निर्णय प्रक्रियेत सध्या कल्याणशेट्टी आहेत. एक युवा नेता म्हणून कल्याणशेट्टी यांचे नाव देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. त्यांना जिल्हाध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळेल की नाही अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. असे असले तरी त्यांनी फडणवीसांकडे जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. त्यांना मंत्रिपद मिळाले तर जिल्ह्यातील ते सर्वात युवा मंत्री ठरणार आहेत.
● आ. विजयकुमार देशमुख
(उत्तर सोलापूर)
मंत्रिपदासाठी तिसरे नाव माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे देखील आहे. गेल्यावेळी पश्चिमम हाराष्ट्रात लिंगायत समाजाचा एकही आमदार नसल्याने विजय देशमुख यांचा मार्ग मंत्रिपदासाठी सुकर झाला होता. मात्र आता विनय कोरे व आ. सचिन कल्याणशेट्टी हे दोघेही आमदार असल्याने यंदा देशमुख यांना दोन प्रतिस्पर्धी मिळाले आहेत.
त्यामुळे देशमुखांना मंत्रिपदाची संधी मिळणे पूर्वीप्रमाणे सोपे राहिले नाही. मात्र, त्यांनी मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. आगामी काळात सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक तसेच विधान परिषद निवडणूक होत आहे. गतवेळी या तिन्ही निवडणुकीत आ. विजयकुमार देशमुखांची भूमिका महत्वाची ठरली होती. त्यामुळे तेही मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये असणार यात शंका नाही.