□ महापालिकेच्या उदासीनतेमुळे वर्ष लोटले तरीही कामकाजच नाही !
सोलापूर : गाजावाजा करत उद्घाटन झाले मात्र गेली एक वर्ष झाले तरीही महापालिकेतील माता रमाई आंबेडकर महिला समुपदेशन केंद्राचे कार्यालय नसल्याने कामकाज बंदच आहे. महिला समुपदेशन केंद्राच्या “दिखावा” उद्घाटनाची वर्षपूर्ती झाली. परंतु या केंद्रात अतिक्रमण विभाग कार्यालयाचे अतिक्रमण “जैसे थे” आहे. महापालिका आयुक्तांनी सूचना करूनही दीड महिना झाला तरीही यासंदर्भात कार्यवाही होत नाही. आज माता रमाई जयंतीविशेष….Anniversary of the inauguration! Mata Ramai Ambedkar Jayanti Special Women’s Counseling Center only ‘show’ Solapur Municipality
महापालिका महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याच नावे माता रमाई आंबेडकर महिला समुपदेशन केंद्राचे उद्घाटन गतवर्षी 7 फेब्रुवारी 2022 रोजी महापालिकेत कौन्सिल हॉलच्या मागच्या बाजूला महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते झाले होते.
महानगरपालिकेतील महिलांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक तेवढे समुपदेशन केंद्र आवश्यक आहे. त्यासाठी कार्यवाही व्हावी. असे आदेश राज्य महिला आयोगाने महापालिकेला दिले होते. त्यानंतर एक वर्षांपूर्वी या महिला समुपदेशन केंद्राचे थाटात उद्घाटन करण्यात आले होते. तो केवळ दिखावाच ठरला. कामकाज सुरु होण्यापूर्वीच महापालिकेतील महिला समुपदेशन केंद्रात अचानकपणे अतिक्रमण विभाग कार्यालय स्थलांतरित केले. त्यामुळे वर्ष लोटले तरी या महिला समुपदेशन केंद्राचे कामकाज बंद आहे.
महिला समुपदेशन केंद्र कार्यालयात थाटण्यात आलेले महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कार्यालय इतरत्र हलवावे, असे पत्र महिला व बालकल्याण समितीच्या मार्फत संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले . मात्र अतिक्रमण विभागाचे कार्यालय अद्यापही इतरत्र हलविण्यात आले नाही. यापूर्वी उपायुक्त विद्या पोळ यांनी इतरत्र हे कार्यालय सुरू करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र त्याचीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर नव्या आयुक्त शितल तेली – उगले यांनी “आहे त्या ठिकाणी” हे केंद्र सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. अद्यापही त्या सूचनेची कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येते. एकूणच प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● महापालिका आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज !
दरम्यान, आज 7 फेब्रुवारी रोजी माता रमाई आंबेडकर यांची जयंती असल्याने त्यांच्या नावे सुरू करण्यात आलेले हे समुपदेशक केंद्र अद्यापही बंद असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. महापालिका आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज वर्तवली जात आहे.
○ महिलांच्या विविध समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी समुपदेशन आवश्यक !
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन नंतर अनेकांची आर्थिक स्थिती बिघडल्याने कौटुंबिक अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे समुपदेशन केंद्राची नितांत गरज वर्तवली जात आहे. महानगरपालिकेतील समुपदेशन केंद्र सुस्थितीत कार्यरत असतील तर महिलांना स्थानिक पातळीवर समुपदेशनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे कौटुंबिक, सामाजिक, ‘भावनिक अशा विविध समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी मार्गदर्शन आणि पीडित महिलांना न्याय मिळण्यासाठी सुयोग्य निर्णय घेणे सुलभ होईल.
महिलांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक तेवढे समुपदेशन केंद्र असणे गरजेचे आहे. तसेच समुपदेशन केंद्रात प्रशिक्षित, अनुभवी व निष्णात समुपदेशक व विधी व वैद्यकीय सल्लागार सह आवश्यक कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक आहे. जेणेकरुन पीडित, गरजू महिलांना योग्य तो न्याय मिळू शकेल.