सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पाळणा कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी महिलांकरिता महापालिकेकडून मोफत बस सेवा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त शितल तेली – उगले यांनी दिली. Free bus service from Municipal Corporation for women coming to Shiv Jayanti Palana program Yesubai actress Prajakta Gaikwad
शिवजयंती निमित्त शनिवारी (ता. 18 फेब्रुवारी) मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पाळणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी हजारोच्या संख्येने महिला उपस्थित राहणार आहेत. या महिलांसाठी महापालिका परिवहन उपक्रमाकडील बस सेवा मोफत उपलब्ध करण्यात येणार असल्याचे आयुक्त शितल तेली – उगले यांनी स्पष्ट केले.
मध्यरात्री हा कार्यक्रम असल्याने घरी परतण्यासाठी वाहनांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. यामुळे ही मोफत बस सेवा उपलब्ध करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान यासाठी शहरातील नेमक्या कोणत्या ठिकाणाहून बस सोडायच्या या संदर्भात ही माहिती मागविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
मोफत बस सेवेचा हा खर्च महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या निधीतून तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● येसूबाईंच्या वेशभूषेत सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती !
– भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी भव्य मिरवणूक !
सोलापूर : उत्तर कसबा येथील भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती निमित्त रविवारी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत “स्वराज्य रक्षक संभाजी” या मालिकेतील सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या येसूबाई यांच्या वेशभूषेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सुरज बंडगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या येसूबाई यांच्या वेशभूषेत सहभागी होणार आहेत. यामध्ये महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग राहणार आहे. लक्षवेधक अशी ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. दरम्यान, या मिरवणूक मार्गावरील बंदोबस्तात असलेल्या सर्व पोलिसांना फूड पॅकेट वाटप करण्यात येणार आहे.
शनिवार, 18 फेब्रुवारी रोजी रंगराज नगर येथील रंगराज गोशाळेत गाईंना 5 टन चारा वाटप करण्यात येणार आहे, असे संस्थापक अध्यक्ष सुरज बंडगर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस उत्सव अध्यक्ष प्रसाद पवार, राज सलगर , सुरज बावधनकर, समर्थ कदम आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.